आताची मोठी बातमी! राजकीय गणितं बदलणार? पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट
महाराष्ट्रच्या राजकारणातील आताची मोठी बातमी, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट
नवी दिल्ली : राजकारणातील आताची मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांदरम्यान १२.२० ते १२.४० अशी २० मिनिटं चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चा होते. आताच्या भेटीचं टाईमिंगही महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात अनेक घडामोडी सुरु आहेत. अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरु आहेत. याचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी काल आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई, अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तींयावरही ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत.
महाराष्ट्रात शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडी सत्तेत आली. पण गेल्या काही दिवसात महाविकास आघाडी आणि भाजपची आरपारची लढाई सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, ही बैठक अचानक झालेली नाही तर पूर्वनियोजित बैठक असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील एखाद्या विकासकामांबाबत ही बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २० मिनिटांच्या बैठकीत राजकारणावर कितपत चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.