पत्नीची दुसऱ्या महिलांशी तुलना करणं पडेल महागात, ही सवय घालेल अडचणीत भर !
तुमच्यापैकी कोणालाही ही सवय असेल, तर आताच थांबा.
Big News : आपल्या पत्नीमध्ये एखादा गुण नसल्यास थेट तिची तुलना कोणा दुसऱ्या महिलांशी करण्याची पुरुष वर्गाची सवय काही नवी नाही. बऱ्याचदा पती-पत्नी किंवा महिला आणि पुरुषांमध्ये वाद होण्यास हा मुद्दा पुरेसा ठरतो. पण, पुरुष वर्गाला सतर्क करणारी ही बातमी आताच सर्वांनी वाचा. कारण, तुमच्यापैकी कोणालाही ही सवय असेल, तर आताच थांबा.
पतीकडून सतत पत्नीची इतर महिलांशी तुलना होणं आणि वारंवार ती आपल्या अपेक्षा पूर्ण करु शकत नसल्याचे टोमणे देणं हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं असून, (Kerala HC) केरळ उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयात हे क्रूर कृत्य असल्याचं मत मांडलं.
न्यायमूर्ती अनिल के. नरेंद्रन आणि न्यायमूर्ती सी.एस. सुधा यांच्या खंडपीठाच्या या निकालानं साऱ्या देशाच्या नजरा वळवल्या आहेत. पतीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वाची बाब समोर ठेवत ही सुनावणी केली. (Big news Husband comparing wife to other women is cruelty says HC)
न्यायालयाचं मत काय ?
'सातत्यानं आपली पत्नी ही अपेक्षां पूर्ण करु शकत नसल्याचं म्हणत तिची इतर महिलांशी वारंवार तुलना करणं हे मानसिक छळाचं क्रूर कृत्य आहे जे पत्नी सहनच करु शकत नाही', असं मत न्यायालयानं नोंदवलं.
पत्नीचे आरोप काय ?
भावांच्या पत्नी असो किंवा प्रश्न सौंदर्याचा असो, तू माझ्या अपेक्षां कधीच पूर्ण केल्या नाहीस असं म्हणत पतीनं आपल्याला वारंवार हीन दर्जाची वागणूक दिल्याचा आरोप याचिकाकर्त्या पत्नीनं केला होता.
थोडक्यात न्यायालयानं दिलेला हा निकाल पाहता, तुम्हालाही अडचणीत यायचं नसेल, तर पत्नीची तुलना इतर महिलांशी करणं ताबडतोब बंद करा.