Mahakumbh : शाकाहारी पोलीस हवेत! महाकुंभ मेळ्याच्या बंदोबस्तात फक्त Vegeterian पोलिसांची ड्युटी लागणार
Maha Kumbh Mela : डीजीपी मुख्यालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना या नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. नेमका काय आहे हा नियम आणि त्याचा परिणाम नेमका कसा असेल, पाहा....
Maha Kumbh Mela : येत्या काही महिन्यांमध्ये, अर्थात 2025 च्या जानेवारी महिन्यामध्ये येऊ घातलेल्या महाकुंभ मेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जगभरातून कोट्यवधी भाविकांची रिघ येत्या काळात उत्तर प्रदेशच्या दिशेनं पाहायला मिळणार असून, त्यासाठी आता प्रशासकीय यंत्रणासुद्धा तयारी करताना दिसत आहेत. एकिकडे यात्रेकरू, साधुसंत आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी सर्वतोपरि प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे महाकुंभ मेळ्यासाठी पोलीस यंत्रणांच्या दृष्टीनं काही नवे नियम लागू करण्याच्या दृष्टीनं निर्णय घेतले जात आहेत.
प्रयागराज महाकुंभ मेळाव्यामध्ये मद्यपान आणि मांसाहाराचं सेवन करणाऱ्या पोलिसांना तैनात केलं जाणार नाही. खुद्द डीजीपी मुख्यालयातून सर्व कमिश्नरेट आणि रेंजमधून प्रयागराजला पाठवल्या जाणाऱ्या पोलीस तुकड्यांसंदर्भात विषेश काळजी घेतली जाण्याचे निर्देश दिले आहेत.
फक्त खाण्यापिण्याच्या सवयीच नव्हे, तर पोलीस कर्मचाऱ्यांची सत्यनिष्ठा, त्यांची प्रतिमा, दैनंदिन वर्तणूक आणि त्यांचा स्वभावही चांगला आणि संस्करक्षण असावा असं म्हणत पोलिसांच्या आयुर्मानाच्या आकड्याविषयीसुद्धा काही मर्यादा आखून देण्यात आल्या आहेत.
डीजीपी मुख्यालयातील एडीजी स्थापना संजय सिंघल यांच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार महाकुंऊ मेळ्यासाठी पाठवल्या जाणाऱ्या पोलिसांचं वय कमाल 40 वर्षे इतकं असावं. तर, मुख्य अधिकाऱ्यांचं वय 50 वर्षे असावं. उपनिरीक्षक किंवा निरीक्षकपदी असणाऱ्यांची वयोमर्यादा 55 वर्षांपर्यंतच असावी. उपलब्ध माहितीनुसार प्रयागराजचेच मूळ रहिवासी असणाऱ्या पोलिसांना महाकुंभ मेळ्यासाठी पाठवलं जाणार नाही. याशिवाय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि व्यवहारकौशल्य असणाऱ्या पोलिसांनात इथं तैनात करण्यात येणार आहे.
हेसुद्धा वाचा : जगातील 7 आश्चर्यांपैकी एके ठिकाणी रहस्यमयीरित्या सापडले 12 सांगाडे; याचा अर्थ समजायचा तरी काय?
दरम्यान प्रयागराजमध्ये सध्या ज्या घरांमध्ये 2 ते 5 खोल्या रिकाम्या आहेत त्या भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा पर्याय स्थानिकांना सुचवण्यात येत आहे. यामुळं जिल्ह्यातील पर्यटनाला वाव मिळेल असं मत जिल्हाधिकाऱ्यांनी मांडलं आहे. यंदाच्या कुंभमेळ्यादरम्यान पेईंग गेस्ट ही विशेष सेवा सुरू केली जाणार असून, पर्यटकांना आणि महाकुंभात सहभागी होणाऱ्यांना किमान दरात चांगल्या सुविधा देण्यावर प्रशासन अधिक भर देताना दिसेल.