अहमदाबाद : राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्या ४ आमदारांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी या आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे. मंगल गावीत, जेवी काकडिया, सोमाभाई पटेल, प्रद्युमन जडेजा यांच्या नावाचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी गुजरातमधून तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आहे. भाजपने तिसरा उमेदवार उतरवल्यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. आमदार भाजपला मत देतील, अशी भीती काँग्रेसला आहे, त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना राजस्थानला पाठवलं आहे.


काँग्रेसच्या आमदारांवर दबाव आहे. भाजप पैशांचा वापर करुन राज्यसभा निवडणुका प्रभावित करत आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे.


१८२ सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपकडे १०३ तर काँग्रेसकडे ७३ आमदार आहेत. राज्यसभा उमेदवाराला जिंकण्यासाठी ३७ मतांची गरज आहे. गुजरात विधानसभेची आकडेवारी बघता दोन्ही पक्ष २ जागा जिंकू शकतात. अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवाणी आपल्याच उमेदवाराला मत देईल, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. राज्यसभेच्या ४ जागांपैकी सध्या भाजपकडे ३ आणि काँग्रेसकडे १ जागा आहे.