बिहार विधानसभा निवडणूक : भाजप-जेडीयूचे जागावाटप जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-जेडीयूचे जागावाटप जाहीर झाले आहे.
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-जेडीयूचे जागावाटप जाहीर झाले आहे. भाजप १२१ तर जेडीयू १२२ जागा लढवणार आहे. सध्या सत्तेत असणाऱ्या जेडीयूने चक्क भाजपला झुकते माप दिले आहे. जागावाटपात भाजपची सरशी दिसून येत आहे.
राज्यातील आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जदयू यांनी युती केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १२२ जागांवर जदयू तर १२१ जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे. जदयू त्यांच्या जागांमधून ७ जागा हिंदुस्थानी अवाम मोर्चाला देणार आहे. पाटण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जागावाटपाची घोषणा केली.
बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत. भाजपाला देण्यात आलेल्या १२१ जागांपैकी ९ जागा या विकासशील इन्सान पार्टीला देण्यात येणार आहेत. दरम्यान, यानिवडणुकीत काँग्रेस ७० जागा लढविणार आहे, त्यांचे सहयोगी डावे पक्ष तीस जागा लढवतील.
'महागठबंधन'मधील जागावाटप झाले आहे. महाआघाडीत आरजेडी १४४, काँग्रेस ७० आणि डावे २९ जागांवर निवडणूक लढवणार आहे. आरजेडी आपल्या कोट्यातून व्हीआयपी पक्षाला काही जागा देईल. आरजेडी, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (माले), सीपीएम आणि व्हीआयपी महाआघाडीतील पक्ष आहेत.