मुंबई : बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. एनडीएजरी सध्या पुढे असली तरी देखील अनेक जागांवर कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या तासाभरात महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली. मात्र, हे कल हळूहळू बदलत गेले. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे. त्यामुळे  सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. तसंच करोना प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसचे पडसाद बिहार निवडणुकीच्या मतमोजणीवर पडताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगानं जारी केलेल्या  मार्गदर्शक सूचनांनुसार बिहारमध्ये निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे. 



मतमोजणीसाठी कोणत्याही प्रकारची घाई न करता आवश्यक तेवढ्या वेळातच मतमोजणी पूर्ण करा, असे आदेश निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. कोरोनामुळे मतमोजणीच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.


बिहार निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत एकूण ७७३७ फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी मतमोजणीच्या ४८५८ फेऱ्या झाल्या आहेत. तर ११९ मतदारसंघामधील मतमोजणी निम्म्यावर आली असल्याची माहिती उपायुक्त आशिष कुंद्रा यांनी दिली. एकंदर दिवसभर आघाडीवर असलेली एनडीए संध्याकाळनंतर काही अंशी मागे पडली आहे. त्यामुळे बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.