बिहारच्या यंदाच्या टॉपरलाही अटक, बोर्डानं रद्द केला निकाल
बिहारच्या बारावीच्या बोर्डाचा टॉपर गणेश कुमार याला शुक्रवारी अटक करण्यात आली. एएनआयच्या रिपोर्टनुसार, बिहार स्कूल परीक्षा बोर्डानं (बीएसईबी) गणेश कुमारच्या परीक्षेचा निकाल रद्द केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय.
पाटणा : बिहारच्या बारावीच्या बोर्डाचा टॉपर गणेश कुमार याला शुक्रवारी अटक करण्यात आली. एएनआयच्या रिपोर्टनुसार, बिहार स्कूल परीक्षा बोर्डानं (बीएसईबी) गणेश कुमारच्या परीक्षेचा निकाल रद्द केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय.
२३ वर्षीय गणेश कुमार विरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आलाय. एका टीव्ही न्यूज चॅनलच्या मुलाखतीत संगीतशी निगडीत काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरंही गणेश देऊ शकला नव्हता.
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या सुदूरवर्ती भागातील छखबीबी गावातील सेकंडरी स्कूल रामनंदन सिंह जगदीप नारायण सिंह हायस्कूलचा विद्यार्थी आहे. गणेश ८२.६ टक्के गुण प्राप्त करून कला शाखेत पहिला आला होता. हिंदीत ९२, संगीतात ८२ आणि समाजशास्त्रात ४२ गुण मिळवणाऱ्या गणेशला 'मिथिला कोकिळा'संबंधीत प्रश्न विचारल्यावर त्यानं शारदा सिन्हा यांच्याऐवजी 'गानकोकिळा' लता मंगेशकर यांचं नाव घेतलं होतं. शिवाय सूर, ताल यांच्यातला भेदही त्याला सांगता आला नव्हता.