Bihar Crime : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमुळे अनेकदा लोकांचे मनोरंजन होतं तर काहीवेळा त्याचा मनावर परिणाम देखील होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. बिहारच्या (Bihar News) छपरा जिल्ह्यात ट्रेनमधला व्हायरल होत असलेला व्हिडीओ हादरवणारा आहे. व्हिडिओमध्ये ट्रेनमध्ये एक तरुण दारात उभा असून तो बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनच्या प्रवाशांवर हल्ला करत आहे. ट्रेनमधल्या त्याच्याच मित्राने तरुणाचा व्हिडीओ शूट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माथेफिरु तरुणाने पट्ट्याने दुसऱ्या धावत्या ट्रेनमधील प्रवाशांवर हल्ला करतानाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हल्ला करणारा तरुण पट्टा घेऊन ट्रेनच्या दारातच उभा होता. त्यानंतर तरुणाने बाजूने जाणाऱ्या ट्रेनच्या प्रवाशांवर पट्ट्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. संपूर्ण ताकद लावून तरुण हा दुसऱ्या ट्रेनमधील प्रवाशांवर पट्ट्याने हल्ला करत होता. जर त्याने मारलेला पट्टा लागून कोणी प्रवासी खाली पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. व्हायरल होत असलेला व्हिडिओ खूपच धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा आहे. सोशल मीडियावर लोकांनी तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


देव नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. "ही व्यक्ती दुसऱ्या ट्रेनमध्ये दाराजवळ बसलेल्या लोकांना बेल्टने मारत आहे, हे खरे आहे का? या व्यक्तीला बेल्टने मारल्यामुळे दरवाजात बसलेली व्यक्तीही ट्रेनमधून पडू शकते, मोठा अपघातही होऊ शकतो. कृपया अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करा," असे देवने म्हटलं आहे.


व्हिडिओ व्हायरल होताच पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. "आम्हाला कळवल्याबद्दल धन्यवाद, कारवाई केली जात आहे," असे रेल्वेनं ट्विट करत म्हटलं आहे. चालत्या ट्रेनच्या दारात उभा असलेला युवक विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दुसऱ्या ट्रेनच्या दरवाजाजवळ बसलेल्या लोकांना बेल्टने मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. ट्रेन जात असताना तो हातात चामड्याचा बेल्ट घेऊन लोकांना अनेक वेळा मारहाण करताना दिसत आहे.



व्हिडीओ समोर आल्यापासून जवळपास साडेपाच लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर 4 हजारांहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. लोकांनी आरोपी तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा मूर्ख लोकांना ट्रेनमध्ये चढू देऊ नये. समोरच्या व्यक्तीला किती लागलं असेल हे देखील त्याला माहित नाही, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर लोकांनी दिल्या आहेत.