`मी काय हवालदार आहे का एवढेच पैसे घ्यायला`; लाच मागणारी महिला पोलीस अधिकारी निलंबित
Bihar Crime : बिहारमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला लाच मागितल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. फोनवरुन तक्रार दाखल करण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याने लाच मागितली होती. याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Crime News : बिहारचं (Bihar Crime) प्रशासन आणि पोलीस यंत्रंणा ही कायमच चर्चेत असते. बिहारमध्ये भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच (Bribe) घेण्याची अनेक प्रकरण समोर येत असतात. अशातच बिहारच्या हाजीपूरमधून एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी (Bihar Police) फोनवर पैशांची मागणी करत आहे. ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर फोनवर पैशांची मागणी केल्याप्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
बिहारच्या वैशालीचे पोलीस अधीक्षक रवी रंजन यांनी महिला पोलीस अधिकारी पूनम कुमारी यांना फोनवरून पैशांची मागणी केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. पूनम कुमारी या महानर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. बुधवारी सकाळी व्हायरल झालेल्या पैशांच्या मागणीची ऑडिओ क्लिप प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी पूनम कुमारी यांना निलंबित केले आहे.
मारहाण प्रकरणात कारवाई करण्यासाठी पूनम कुमारीने 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे. पिंटू कुमारने पुनम कुमारी यांना एकदा 5 हजार रुपये आणि एकदा 10 हजार रुपये दिले होते. तर 10 हजार रुपये बाकी होते. पिंटू कुमारींनी पूनम कुमारीला फोन करून काम कुठपर्यंत आले आहे असे विचारले. त्यावेळी पूनम कुमारी यांनी फोनवर उरलेल्या पैशांबाबत चर्चा केली. याचीच ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर पूनम कुमारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, 25 हजारांची रक्कम न मिळाल्याने पूनम कुमारी संतप्त झाल्या होत्या. मी काय हवालदार नाही की तू दिलेल्या पैशांमध्ये तुझं काम करेल. आधी मी सांगितलेले काम पूर्ण कर मग तुझे काम करेन. नाहीतर जे दिलं आहे ते घेऊन जा, असे पूनम कुमारी म्हणाल्या. पूनम कुमारी यांनी तब्येत खराब असल्याचे सांगून बरे झाल्यावर तुझे काम पूर्ण करेल असेही त्यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
29 ऑगस्ट रोजी लावापूर गावातील सिंटू राय आणि रामानंद राय यांच्यात वाद झाला होता. याप्रकरणी महानर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपास अधिकारी पूनम कुमारी होत्या. या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करण्यासाठी त्यांनी फोनवरून पैशांची मागणी केली होती.