पाटणा : बिहारमध्ये (Bihar)  मुख्यमंत्री नितीशकुमार (CM Nitish Kumar) यांचे सरकार स्थापन ((Nitish Kumar Government) ) झाले आणि काही दिवसात एका मंत्र्याने चक्क राजीनामा दिला. त्यामुळे जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  नितीश सरकारमध्ये शिक्षणमंत्री (Bihar Education Minister ) झालेल्या डॉ. मेवालाल चौधरी (Mewa Lal Choudhary )यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. चौधरी यांनी आज पदभार स्वीकारला आणि काही तासांतच त्यांना शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, याआधी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी देखील, सहायक प्राध्यपक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीस शिक्षणमंत्री बनवण्यात आल्यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. दुर्देव पाहा जे भाजपवाले कालपर्यंत मेवालालचा शोध घेत होते, आज मेवा मिळाताच त्यांनी मौन बाळगले आहे, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले होते. त्यानंतर आता मेवालाल यांना राजीनामा द्यावा लागला आहे. 


राजीनामा का द्यावा लागला?


डॉ. मेवालाल चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. माजी आयपीएस अमिताभ दास यांनीही गंभीर आरोप केले आहेत.  कृषी विद्यापीठाच्या नियुक्ती घोटाळ्यात मेवालाल यांचा संबंध असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी आयपीएस अमिताभ दास यांनी डीजीपी यांना पत्र लिहिले आहे. चार वर्षांपूर्वी २०१६ मध्ये कृषी विद्यापीठ नियुक्ती घोटाळा उघडकीस आला होता. २८१ पदांसाठी जाहिरात दिल्यानंतर १६६ जणांची नेमणूक करण्यात आली. कमी गुण मिळवणारे उमेदवार पास झाले आणि अधिक संख्या असलेले उमेदवार अपात्र ठरविल्याचा आरोप आहे.


नितीश यांना भेटल्यानंतर... 


भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मेवालाल चौधरी बुधवारी अणे मार्गावर मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली. नितीश आणि मेवालाल यांच्यात सुमारे अर्धा तास बैठक चालू होती. ही बैठक असल्याने मेवालाल यांच्या राजीनाम्याबाबत अंदाज वर्तविण्यात येत होता.


 मेवालाल यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीश सरकार विरोधकांच्या रडारावर आले आहे.  माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना लक्ष्य केले आहे. तेजस्वी यांनी म्हटले आहे, “मी म्हटलं होतं ना तुम्ही थकला आहात त्यामुळे तुमची विचारशक्ती क्षीण झाली आहे” जाणीवपूर्वक भ्रष्ट मंत्र्याला मंत्री बनवले. त्यांनी पदभार स्वीकारला आणि काही तासांनंतर राजीनामा देण्याचे नाटक केले. आपण खरे अपराधी आहात. तुम्ही मंत्री का झालात?  


नितीश कुमार मंत्रिमंडळात भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मेवालाल चौधरी यांना कसे स्थान मिळाले, असा प्रश्नविरोधकांनी विचारला होता. तसेच हा मुद्दा राजद आणि सीपीआयने उचलून धरला होता. अखेर सरकार स्थापन झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी आज डॉ. मेवालाल चौधरी यांनी शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मंत्रीपदाचा राजीनामा देताना मेवालाल चौधरी यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तरही दिले आहे.