बिहार निवडणूक: खूर्ची 1, आघाडी 4 आणि प्रतिस्पर्धी 6
कोण होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री?
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी एक-दोन नव्हे तर मुख्यमंत्रीपदासाठी तब्बल सहा उमेदवार मैदानात असून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कोणाला मिळणार याबाबत उत्सूकता कायम आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी यंदा कांटे की टक्कर होणार आहे. कारण सर्व हेवीवेट उमेदवार रिंगणात आहेत आणि मुख्यमंत्रीपदावर आपला दावा ठोकत आहेत.
जेडीयू, भाजपा, हम आणि व्हीआयपी युतीने पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे, तर महाआघाडीत आरजेडी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकत आहेत. तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मानले जात आहे.
याशिवाय सहा पक्षांचा समावेश असलेल्या ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर अलायन्सने माजी केंद्रीय मंत्री आणि आरएलएसपी अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांना, तर प्रगतिशील लोकतांत्रिक युतीने जनअधिकार पक्षाचे अध्यक्ष पप्पू यादव यांना मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार बनवलं आहे. तर पुष्पम प्रिया चौधरी यांनीही स्वतःला बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे चिराग पासवान यांनी अजून तरी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलेले नाही, परंतु त्यांच्या पक्षाच्या एलजेपीने त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले आहे.
नितीश कुमार
नीतीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. पहिल्यांदा 1985 मध्ये बिहार विधानसभेसाठी निवडून गेले. 9 व्या लोकसभेसाठी 1989 मध्ये पहिल्यांदा त्यांची निवड झाली. 1991, 1996, 1998, 1999 व 2004 मध्ये लोकसभेसाठी ते निवडून गेले.
एप्रिल ते नोव्हेंबर 1990 पर्यंत नीतीश कुमार केंद्रीय कृषि आणि सहकार राज्य मंत्री होते. 19 मार्च 1998 ते 5 ऑगस्ट 1999 पर्यंत ते केंद्रीय रेल्वेमंत्री होते. 13 ऑक्टोबर 1999 ते 22 नोव्हेंबर 1999 पर्यंत ते परिवहन मंत्री होते. 27 मे 2000 ते 20 मार्च 2001 पर्यंत ते कृषी मंत्री होते. त्यानंतर 22 जुलै 2001 ते 21 मे 2004 पर्यंत ते रेल्वेमंत्री होते.
नीतीश कुमार हे 03 ते 10 मार्च 2000 पहिल्यांदा 7 दिवसासाठी मुख्यमंत्री बनले होते. 24 नोव्हेंबर 2005 ते 24 नोव्हेंबर 2010 पर्यंत आणि 26 नोव्हेंबर 2010 ते 17 मे 2014 पर्यंत त्यानंतर 22 फेब्रुवारी 2015 पासून ते आतापर्यंत ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत.
तेजस्वी यादव
तेजस्वी यादव हे महाआघाडी सरकारमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री होते. सध्या ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचे पूत्र आहेत. त्यांचा अनुभव तसा कमी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा त्यांनी निवडणूक निवडली. नितीश कुमारांच्या नेतृत्वात ते सरकारमध्ये आले. पण नंतर जेडीयूने आरजेडीसोबत नातं तोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली.