पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूर आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचे तिकीट अखेर कापण्यात आले आहे. बक्सरमधून निवडणूक लढवण्यासाठी गुप्तेश्वर पांडे उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी  जेडीयूमध्ये प्रवेशही केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, जेडीयूने सर्व १२१ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात गुप्तेश्वर पांडे यांचे नाव नाही. विशेष म्हणजे ज्या बक्सरमधून ते निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. त्या जागेवर भाजपने परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी आपण यंदा निवडणूक लढवणार नसल्याचे फेसबूकवर जाहीर केले आहे. 


मात्र त्यांचे तिकीट कापले गेल्यामुळेच त्यांनी आता सारवासारव करण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. निवडणूक लढवण्यासाठी अतिउत्साहात पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा देणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना महाराष्ट्र द्वेश भोवल्याचे बोलले जात आहे. 


दरम्यान, बिहारमध्ये गुप्तेश्वर पांडे निवडणूक रिंगणात उतरल्यास शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरु झाली होती. बिहार निवडणुकीत शिवसेना ५० उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात झालेल्या बदनामीनंतर शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज असल्याचं शिवसेना खासदार अनिल देसाईंनी म्हटले आहे.


२०१५ मध्ये शिवसेनेनं ८० जागा लढवत २ लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती. सुशांतसिंह प्रकरणात महाराष्ट्राची बदनामी करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंविरोधातही शिवसैनिक लढणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. मात्र, त्याआधीच त्यांचे तिकीट कापले गेले.