गर्लफ्रेण्डबरोबर लग्न करण्यासाठी कोर्टात पोहोचला 5 मुलांचा बाप; त्याचवेळी पहिली पत्नी आली अन्...
Husband Wife Drama in Court: कामानिमित्त हा इसम दुसऱ्या शहरात काही महिने वास्तव्यास होता तेव्हाच तो त्याच्या कंपनीमधील एका मुलीच्या प्रेमात पडला. त्याने या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे लग्नाच्या नोंदणीसाठी कोर्टात पोहोचले तेव्हाच तिथे या व्यक्तीची पहिली पत्नी पोहोचली.
Husband Wife Drama in Court Campus: दोघात तिसरा आता सगळं विसरा असा प्रकार अनेक नात्यांसंदर्भात पहायला मिळतो. असाच काहीसा प्रकार आज बिहारमधील एका कोर्टाच्या आवारात पहायला मिळाला. 5 मुलांचा बाप असलेला व्यक्ती दुसरं लग्न करण्यासाठी आपल्या प्रेयसीबरोबर कोर्टात आला त्यावेळीच पहिली पत्नी कोर्टात आली आणि गोंधळ घातला. आपला नवरा प्रेयसीबरोबर लग्न करतोय याची माहिती मिळाल्यानंतर ही महिला तातडीने कोर्टात आली आणि लग्न लागण्याआधीच कोर्टात कुटुंब कलह सुरु झाल्याचं चित्र पहायला मिळालं.
प्रेयसीला माहितीच नाही हा विवाहित
या व्यक्तीच्या पत्नीने केलेली आरडाओरड आणि गोंधळ पाहून कोर्टात गर्दी जमा झाली. नंतर हे प्रकरण हाताबाहेर जात आहे असं वाटू लागल्यानंतर बघ्यांपैकी काहीजणांनी मध्यस्थी केली. विशेष म्हणजे पहिल्या पत्नीला पोटापाण्याची व्यवस्था पतीने करावी याची चिंता होती तर या व्यक्तीच्या प्रेयसीला आपला प्रियकर विवाहित आहे याचीच कल्पना नव्हती. मात्र प्रियकर विवाहित असल्याचं समजल्यानंतरही ही महिला लग्नाला तयार झाल्याने कोर्टात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.
पाच मुलांचा बाप अन् लव्हस्टोरी
जमुई जिल्ह्यामधील झाझा येथे राहाणाऱ्या जितेंद्रचं पहिलं लग्न 2011 साली रूबीदेवीशी झालं होतं. त्यानंतर या दोघांना 5 मुलं झाली. मध्यंतरी जितेंद्र कामानिमित्त जमशेदपुरला गेला. तिथे काही महिने वास्तव्यास असताना तो शेजारी राहणाऱ्या काजल नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. प्रेमात अंधळ्या झालेल्या जितेंद्रने आठवड्याभरापूर्वी एका मंदिरामध्ये सात फेरे घेत काजलबरोबर दुसरं लग्न केलं. त्यानंतर शुक्रवारी लग्नाची नोंदणी करण्यासाठी तो कोर्टात आला होता. दरम्यान पहिल्या पत्नीला याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर ही कोर्टात पोहोचली आणि गोंधळ घालू लागली. आपल्याला आणि आपल्या मुलांसाठी संपत्तीचा वाटा द्यावा अशी मागणी पहिल्या पत्नीने केली.
सर्वांनी एकत्र रहावं अशी तिची इच्छा
काजल ही केवळ जितेंद्रच्या शेजारी राहत नव्हती तर दोघेही एकाच कंपनीमध्ये कामाला होते. पत्नीने आपला पती दुसरं लग्न करत असल्याबद्दल आक्षेप नसल्याचं सांगितलं. आपल्याला आणि आपल्या मुलांना जगण्यासाठी आवश्यक असलेला पतीच्या कमाईमधील अर्धा वाटा आपल्याला हवा असल्याचं या महिलेचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे काजलला जितेंद्र विवाहित असल्याची कोणतीही अडचण वाटत नाही. त्यामुळेच सर्वांनी मिळून एकत्र रहावं अशी काजलची इच्छा आहे. या प्रकरणाचा कोणताही तोडगा निघालेला नाही. कोर्टामध्ये लग्नाची नोंदणी न करताच जितेंद्र, काजल आणि जितेंद्रची पहिली पत्नी कोर्टातून बाहेर पडले. मात्र या सर्व गोंधळामुळे कोर्टातील लोकांना काही वेळ ड्रामा पहायला मिळाला हे मात्र खरं.