प्रेम विवाह, हुंडा अन् 6 पोलिसांनाच मारहाण! बिहारमधील डोकं चक्रावून टाकणारा प्रकार
Police Attacked On Crime Spot: ज्या महिलेला मारहाण होत होती तिनेच फोन करुन यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली असता प्रकरण अधिक चिघळलं जेव्हा या टीमवरच हल्ला करण्यात आला.
Police Attacked On Crime Spot: बिहारमधील (Bihar Crime News) मुजफ्फरपूरमधील देवरिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक विचित्र प्रकार घडला आहे. एका नवविवाहित महिलेला बेदम मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याआधी या पीडित महिलेच्या सासरच्या व्यक्तींना पोलिसांनाच मारहाण केली. या मारहाणीमध्ये 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. सर्व जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रेम विवाह अन् मारहाण
हा सर्व प्रकार देवरिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बंदी गावामध्ये घडला. येथे राहणाऱ्या एका ज्योतिषाने 3 महिन्यांपूर्वी गावातील एका तरुणीबरोबर अंतरजातीय विवाह केला होता. प्रेमसंबंधांनंतर हे दोघे लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरु होतं. मात्र त्यानंतर काही दिवसांनी या ज्योतिषाच्या घरच्यांनी आपल्या सुनेला मारहाण करण्यास सुरुवात केली. या महिलेला सासरच्या लोकांनी घरातून बाहेर काढलं. मात्र ही महिला रविवारी पुन्हा तिच्या सासरी गेली. या महिलेने घरामध्ये पाऊल ठेवताच पुन्हा तिला मारहाण करण्यात आली. सासरवाडीमधील अनेकांनी या महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिला घराबाहेर काढलं. सासरचे लोक आपल्याकडून हुंडा मागत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
पोलिसांना कळवलं पोलिस आले पण...
आपल्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती या महिलेने फोनवरुन पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही आरोपींनी हल्ला केला. यामध्ये प्रवीण कुमार, लक्ष्मण राम, नेहा कुमारी, सौरभ कुमार, विकाश कुमार आणि मनोज कुमार सिंह हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या सर्व जखमी कर्मचाऱ्यांना पारू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
आरोपींचा शोध सुरु
या प्रकरणामध्ये सरैयाचे प्रमुख पोलिस अधिकारी कुमार चंदन यांनी, "एका महिलेने फोनवर तिच्या सासरचे लोक तिला मारहाण करत असल्याची तक्रार केली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी पोहचली असता त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असून पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात येईल," अशी माहिती दिली. एवढ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण नेमकी कशी झाली, यासाठी आधीपासून काही तयारी करण्यात आली होती का? पोलिस कर्मचारी आणि आरोपींमध्ये आधी काय बोलणं झालं यासंदर्भातील तपासही केला जाणार आहे.
मात्र अशाप्रकारे पोलिसांच्या एका टीमवरच हल्ला करण्यात आल्याने गावात तणावाचं वातावरण आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.