बिहारमधील (Bihar) एक घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. एका शहीद जवानाच्या (Martyr) वडिलांशी पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनामुळे हा संताप आहे. पोलिसांनी जवानाच्या वडिलांना अटक करताना अक्षरश: फरफटत नेलं. वैशाली गावात ही घटना घडली आहे. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसह झालेल्या संघर्षात हा भारतीय जवान शहीद झाला होता. या जवानाचं स्मारक (Memorial) उभारलं असून, त्याच्याशी संबंधित जमिनीवरुन वाद सुरु आहे. याच वादातून पोलिसांनी जवानाच्या वडिलांना अटक (Arrest) केली आहे.
  
पोलीस जवानाच्या वडिलांना अटक करताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. यामध्ये पोलीस शहीद जवान जयकिशोर यांचे वडील राज कपूर सिंग यांना अटक करताना दिसत आहे. पोलिसांनी राज कपूर यांना अटक करताना फरफटत नेलं. दरम्यान, पोलिसांनी त्यांना जबर मारहाण केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावकऱ्यांनी राज कपूर यांच्यावर सरकारी जमिनीचा कब्जा घेतल्याचा आरोप केला. दलित गावकऱ्यांच्या आरोपानंतर त्यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



"पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी 15 दिवसांत हे स्मारक हटवा असं आम्हाला सांगितलं. काल रात्री त्यांनी माझ्या वडिलांना अटक केली. त्यांनी त्यांना फरफटत नेलं, कानाखाली मारली, अत्याचार केलं. यानंतर पोलीस ठाण्यात नेऊन पुन्हा मारहाण केली," असा आरोप राज कपूर सिंग यांचा मुलगा नंदकिशोर सिंग यांनी केलं आहे. 


"पोलीस रात्री आले आणि एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे अटक केली," असा आरोप त्यांनी केला आहे. अटकेची बातमी पसरताच गावकरी संतप्त झाले. गावकरी स्मारकाजवळ एकत्र आले आणि त्यांनी पोलिसांविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. 


पोलीस अधिकारी पूनम केसरी यांनी गावकऱ्यांच्या तक्रारीवरच आपण कारवाई केल्याची म्हटलं आहे. स्मारकामुळे शेजाऱ्याच्या शेतात जाण्याचा मार्ग बंद झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


"स्मारक बांधल्यानंतर त्याच्या बाजूला भिंतीही उभारण्यात आल्या. सरकारी जमिनीवर हे अतीक्रमण कऱण्यात आलं आहे. त्यांना वारंवार हे अतीक्रमण हटवण्यास सांगण्यात आलं होतं," अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.


गतवर्षी फेब्रुवारीमध्ये, शहीद जवानाच्या कुटुंबाने घराबाहेरील जमिनीवर पुतळा उभारत स्मारक उभारलं होतं. या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमासाठी अनेक सरकारी अधिकारी उपस्थित होते. हे स्मारक बेकायदेशीरपणे सरकारी जमिनीवर उभारण्यात आल्याचा आरोप आहे. सिंग यांचे शेजारी हरिनाथ राम यांनी आरोप केला असून, या स्मारकामुळे आपला शेतात जाणारा मार्ग बंद झाल्याचा आरोप केला आहे.