Video Bike Catch Fire On Petrol Pump: अनेकदा कार आणि बाईकला आग लागल्याच्या घटना घडत असतात. अनेक व्हिडीओमध्ये तर अचानक गाड्यांना आग लागते आणि गाड्या आगीच्या एखाद्या गोळ्यासारख्या जळू लागतात असं दिसून येतं. असे अपघात होतात तेव्हा कधीतरी वाहनात किंवा बाईकवर कोणीतरी प्रवास करत असतं तर कधीतरी पेट्रोल पंपावरील गाड्या अचानक पेट घेतात. मात्र सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडीओ एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 


एक चूक महागात पडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये एक बाईकस्वार पेट्रोल पंपावर बाईकमध्ये पेट्रोल भरवून घेण्यासाठी थांबलेला दिसतोय. काही वेळानंतर अचानक या बाईकला आग लागते. हा व्हिडीओ इतका धक्कादायक आहे की तो पाहून तुम्ही पुन्हा पेट्रोल पंपावर जाण्याआधीही दोनदा विचार कराल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक बाईकचालक आपल्या एका सहकाऱ्याबरोबर पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आल्याचं दिसत आहे. पेट्रोल भरुन घेतल्यानंतर ते बाईक सुरु करुन पुढे निघतात. मात्र बाईकचं हॅण्डल पेट्रोल पंपाच्या पाईपामध्ये अडकतं. हीच चूक या दोघांना महागात पडली. हॅण्डलमध्ये अडकलेला हा पाईप पुन्हा पेट्रोल पंपाच्या स्टॅण्डवर ठेवण्यासाठी मागे बसलेली व्यक्ती बाईकवरुन उतरते. त्यावेळेस या पाईपामधून धूर निघू लागतो. त्यानंतर पुढे काही समजण्याआधीच या बाईकला आग लागते. बाईकचं रुपांतर काही क्षणांमध्ये आगीच्या जळत्या गोळ्यात होतं. धक्कादायक म्हणजे या आगीत बाईक चालवणारी व्यक्तीही होरपळते. 


पंपावरील मशीनही जळालं...


बाईकवर मागे बसलेली व्यक्ती बाईकने पेट घेतल्याचं पाहून तिथून पलून जाते. त्यानंतर अंगावरील कपड्यांनी पेट घेतलेला असतानाच चालकही बाईकपासून दूर पळतो. पंपाच्या आजूबाजूने जाणारे लोकही या ठिकाणी जमा होतात. आगीचा भडका वाढतो आणि पेट्रोल पंप मशीनही आगीच्या भक्षस्थानी पडतं. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, कुठला आहे, होरपळलेल्या व्यक्तीचं काय झालं याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.



पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये इंधन भरताना अनेक बारीकसारीक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही.


पेट्रोल पंपावर असताना कोणत्या नियमांचं पालन करावं जाणून घेऊयात...


- पेट्रोल पंपावर धुम्रपान करु नये.
- माचिस अथवा लायटरचा वापर करु नये.
- मोबाईल फोनचा वापर टाळावा.
- पेट्रोल भरताना वाहनाचं इंजिन बंद करावं.
- पेट्रोल भरुन झाल्यानंतर दुचाकी धक्का देत पेट्रोल पंपाच्या मशीनपासून काही अंतर पुढे गेल्यावर सुरु करावी
- पेट्रोल पंपावर खाद्य पदार्थ खाणं किंवा द्रव्य प्राशन करणं टाळावं.