Bird Flu Outbreak : महाराष्ट्राच्या जवळ पोहोचला बर्ड फ्ल्यू
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपाठोपाठ आणखी एक संकट
मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने पुन्हा एकदा संपूर्ण देशावर दहशत निर्माण केली आहे. असं असताना बर्ड फ्ल्यूचं सावटही महाराष्ट्रावर दिसत आहे. महाराष्ट्राच शेजारील राज्य केरळमध्ये बर्ड फ्ल्यूचे रूग्ण सापडले आहेत.
केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यातील थाकाझी पंचायतीमधून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पुरक्कड येथून पाठवलेल्या बदकांना बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी बाधित भागात एक किलोमीटरच्या परिघात बदके, कोंबडी आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत.
फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी ए. अलेक्झांडर यांनी गुरुवारी पशुसंवर्धन, आरोग्य आणि पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने थाकाझी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 10 च्या एक किलोमीटरच्या परिसरात सर्व बदके, कोंबडी आणि इतर पाळीव पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत.
यासोबतच अधिकाऱ्यांनी बाधित क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून येथून वाहने व लोकांची ये-जा बंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी फ्लू बाधित भागात कोंबडी, बदके आणि पक्ष्यांची अंडी, मांस इत्यादींच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने चंपाकुलम, नेदुमुडी, मुत्तर, वियापुरम, करुवट्टा, थ्रिकुन्नापुझा, थाकाझी, पुरक्कड, अंबालापुझा दक्षिण, अंबालापुझा उत्तर, हरिपाद नगरपालिका क्षेत्रात निर्बंध लागू केले आहेत. यासोबतच या भागातील पक्षी पकडून नष्ट करण्यासाठी प्रशासनाने पशुसंवर्धन विभागाचे प्रतिसाद पथक तयार केले आहे.