सावधान...राजधानी दिल्लीसह देशातील ६ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका
नॉन व्हेज खात असाल तर अंडी आणि चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घ्या.
मुंबई : दिल्लीसह 6 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा कहर पाहायला मिळत आहे. आता कोंबड्यांमध्येही बर्ड फ्लू पसरू लागला आहे. त्यात महाराष्ट्रातही ठिकठिकाणी पक्षी मरून पडल्याच्या घटना वाढू लागल्यानं, सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या रिंगणाबोडी परिसरात शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मृत पक्ष्यांमध्ये पोपट, चिमण्या, कावळे आणि जंगली कबुतरांचा समावेश आहे. अज्ञात आजारानं त्यांचा मृत्यू झाला असून, मृत पक्षांचे नमुने भोपाळला राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यातील पाटोद्यातही गेल्या दोन दिवसात 22 कावळे मेले आहेत. तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी गावात १२८ गावरान कोंबड्या दगावल्या. थंडीचा कडाका वाढल्यानं कोंबड्यांना न्यूमोनिया झालाय की, बर्ड फ्लू पसरत आहे, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातल्या विविध राज्यात कोंबड्या आणि पक्षी मृत्यूमुखी पडल्याच्या घटना वाढत आहेत. हरियाणातल्या दोन पोल्ट्रींमधल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं स्पष्ट झालं. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि केरळमध्येही मोठ्या प्रमाणात कोंबड्या दगावल्यानं अलर्ट जारी करण्यात आला.
खबरदारीचा उपाय म्हणून परराज्यातल्या कोंबड्या आणि अंड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं तुम्ही देखील नॉन व्हेज खात असाल तर अंडी आणि चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. हॉटेलातून फूड मागवण्याऐवजी घरच्या जेवणालाच सध्या प्राधान्य द्या.