Who Is This Women With Mahatma: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा मंत्रिमंडळाची स्थापना झाली तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रिमंडळामध्ये एका महिलेचाही समावेश होता. ही महिला अनेकदा महात्मा गांधींबरोबर फोटोंमध्येही दिसून यायची. तुम्हीही महात्मा गांधींच्या अनेक जुन्या फोटोंमध्ये या महिलेला पाहिलं असेल. विशेष म्हणजे महात्मां गांधीच्या सांगण्यावरुनच या महिलेला देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळात स्थान मिळालं होतं. मात्र ही महिला नेमकी होती तरी कोण? असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल. यासंदर्भात आपण आज या महिलेच्या 135 व्या जयंतीनिमित्त तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत.


कोण आहे ही महिला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण ज्या महिलेबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे, राजकुमारी अमृत कौर आहलुवालिया! राजकुमारी या देशाच्या पहिल्या कॅबिनेट मंत्री झाल्या. मात्र त्याचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये नव्हतं. महात्मा गांधींच्या सांगण्यावरुन त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी जे काही केलं ते सारं काही ऐतिहासिकच ठरलं. राजकुमारी अमृत कौर यांच्याकडे देशाच्या आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या काळातील सर्वात मोठी आणि आजही अस्तित्वात असलेली मिळकत म्हणजे 'एम्स'ची (ऑल इंडिया इंन्सीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची) स्थापना. देशातील एक नामांकित संस्था म्हणून 'एम्स'ला उभं करण्यात राजकुमारी अमृत कौर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राजकुमारी अमृत कौर या केवळ भारताच्या पहिल्या महिला आरोग्यमंत्री झाल्या असं नाही तर त्या वर्ल्ड हेल्थ असेंबलीच्या प्रमुख होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.


तिच्या जन्माआधीच वडिलांनी स्वीकारला ख्रिश्चन धर्म


राजकुमारी अमृत कौर आहलुवालिया कपूरथला येथील राजघराण्याच्या कन्या होत्या. राजकुमारी अमृत कौर यांच्या जन्माच्या आधीच त्यांचे वडील हरनाम सिंह यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. हरनाम सिंह यांची भेट गोलकनाथ चॅटर्जींबरोबर झाली. चॅटर्जी हे एका मिशनरीसाठी काम करायचे. त्यांच्या प्रभावाने हरनाम सिंह यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. नंतर गोलकनाथ यांची कन्या प्रिसिला हिने हरनाम सिंह यांच्याबरोबर लग्न केलं. हरनाम आणि प्रिसिला यांना 10 मुलं झाली. सर्वात धाकट्या मुलीचा जन्म 2 फेब्रुवारी 1889 रोजी झाला. या मुलीचं नाव अमृत कौर असं ठेवण्यात आलं.


लंडनला गेल्या अन् एका प्रसंगाने आयुष्य बदललं


राजकुमारी अमृत कौर शिक्षणासाठी लंडनला गेल्या. तिथे त्यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला. याच वेळी घडलेल्या एक घटनेनं त्यांच्या आय़ुष्याला कलाटणी मिळाली. एकदा त्या लंडनमध्ये असताना एका पार्टीसाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी एका इंग्रजाने तिला माझ्यासोबत नाचणार का अशी विचारणा केली. राजकुमारी अमृत कौर यांनी नाचण्यास नकार दिल्यानंतर ती व्यक्ती भारतीयांचा अपमान करु लागली. याच घटनेनंतर राजकुमारी अमृत कौर यांनी राष्ट्रीय स्वातंत्रता आंदोलनामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली.


अनेक फोटोंमध्ये त्या गांधींबरोबर दिसतात


1909 साली त्या भारतात परतल्या तेव्हा गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कामाने प्रभावित झाल्या. गोखलेंपासून प्रेरणा घेऊन त्या राष्ट्रीय आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. गोखलेंच्या माध्यमातूनच राजकुमारी अमृत कौर यांनी महात्मा गांधी आणि त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतलं. पुढे जाऊन राजकुमारी अमृत कौर या महात्मा गांधींच्या अनुयायी झाल्या. दांडी यात्रेसाठी त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागली. 1930 साली आई-वडिलांच्या निधनानंतर राजकुमारी अमृत कौर यांनी आपला राजवाडा सोडला आणि आपलं आयुष्य पूर्णपणे स्वातंत्र आंदोलनासाठी समर्पित केलं. त्या अनेकदा महात्मा गांधींबरोबर वेगवेगळ्या दौऱ्यांवर जायच्या. अनेक फोटोंमध्ये त्या गांधींबरोबर दिसतात.


थेट परदेशातून आणली आर्थिक मदत


18 फेब्रुवारी 1956 साली तत्कालीन आरोग्य मंत्री म्हणून राजकुमारी अमृत कौर यांनी लोकसभेमध्ये एक नवं विधेयक मांडलं. त्यावेळी त्यांच्याकडे आपण काय बोलणार आहोत यासंदर्भातील कोणतंही भाषण तयार नव्हतं. त्यांनी उस्फुर्तपणे भाषण दिलं. त्यांनी केवळ विधेयक मांडलं नाही तर 'एम्स' उभारण्यासाठी निधी गोळा करायलाही सुरुवात केली. अंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या ओळखीचा फायदा घेत राजकुमारी अमृत कौर यांनी अमेरिका, स्वीडन, पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिळवला. राजकुमारी अमृत कौर यांनी त्यांच्या मालकीचं शिमल्यामधील एक महालवाज घरही 'एम्स'ला दिलं. 2 ऑक्टोबर 1964 रोजी त्याचं निधन झालं.