नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून दिल्लीतील रामलीला मैदानावर भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महाअधिवेशनाचे उदघाटन होणार असून, या अधिवेशनासाठी १३ हजार प्रतिनिधी उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या अधिवेशनासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह पक्षाचे केंद्रीय मंत्री विविध राज्यांतील मंत्री, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, संसदेतील सदस्य, विधानसभांतील सदस्य, विविध शहरांतील पक्षाचे महापौर दिल्लीत दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात अमित शहा बीजभाषण करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात एकूण ३ प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन प्रस्ताव राजकीय स्वरुपाचे आणि एक धन्यवाद प्रस्ताव असेल. देशातील सवर्णांना आर्थिक निकषांवर १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात येईल. अधिवेशात माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजलीही वाहण्यात येईल. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असताना नरेंद्र मोदी या भाषणात कोणते मुद्दे मांडतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. २०१४ पेक्षा जास्त २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. 


नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर हिंदी पट्ट्यातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ याही राज्यांमधील भाजपची सत्ता हातातून गेली आहे. त्यामुळे या राष्ट्रीय अधिवेशनाला महत्त्व आले आहे. दुसरीकडे अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदूत्त्ववादी संघटनांनी राम मंदिर उभारण्यासाठी वटहुकूम आणण्याची मागणी केली होती. पण नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या मुलाखतीत ही मागणी फेटाळली होती. भाजपचा प्रमुख विरोधक काँग्रेसने राफेलच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून रान उठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सातत्याने हा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळेही यावर भाजप पुढे काय रणनिती आखणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.