नवी दिल्ली : आज लोकसभेत तिहेरी तलाक बिल सादर केलं जाणार आहे. या मुद्द्यावर संसदेत जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. भाजपने आपल्या सगळ्या खासदारांना संसदेत हजर राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. याआधी मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक ज्याला तिहेरी तलाक असं देखील म्हटलं जातं. हे बिल लोकसभेत पास झालं होतं पण राज्यसभेत हे बिल पास होऊ शकलं नव्हतं. त्यानंतर आता पुन्हा लोकसभेत हे बिल मांडलं जाणार आहे. तिहेरी तलाक रोखण्यासाठी आज या विधेयकावर चर्चा होणार आहे. सरकार आणि विरोधी पक्षाने देखील याबाबत सहमती दर्शवली आहे. मागील आठवड्यात २७ डिसेंबरला या विधेयकावर चर्चासाठी सहमती झाली होती. काँग्रेसने देखील या चर्चेत सहभागी होण्याची तयारी दाखवली होती. काँग्रेसने देखील आज आपल्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते मलिकार्जुन खडगे यांनी म्हटलं होतं की, 'मी तुम्हाला विनंती करतो की या विधेयकावर २७ डिसेंबरला चर्चा केली जावी. आम्ही या चर्चेत सहभागी होऊ. काँग्रेस आणि इतर पक्ष देखील चर्चेसाठी तयार आहेत. 'केंद्रीय मंत्रिमंडळाने मागच्या वर्षी १५ डिसेंबरला या विधेयकाला मंजुरी दिली होती. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. अर्थमंत्री अरूण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, कायदे मंत्री रविशंकर प्रसाद आणि कायदे राज्यमंत्री पी पी चौधरी हे या कमिटीते सदस्य होते. 


२२ ऑगस्ट २०१७ ला सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाकला बेकायदा आणि असंवैधानिक असल्याचं म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्याआधी यावर्षी तिहेरी तलाकची १७७ प्रकरणं समोर आली होती. कोर्टात यापैकी ६६ प्रकरणं सादर केली गेली होती. यामध्ये उत्तर प्रदेश सगळ्यात पुढे आहे. यामुळे सरकारने तिहेरी तलाक कायदा करण्याचा निर्णय घेतला होता.