पाटणा: मोदी सरकारने सत्तेत अपेक्षित वाटा न दिल्यामुळे नाराज असलेले संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सर्वेसर्वा नितीश कुमार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जुने सहकारी आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी भाजपला सावधानतेचा इशारा दिला आहे. नितीश कुमार विश्वासघात करू शकतात. भाजपने त्यासाठी तयार राहावे, असे कुशवाह यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीश कुमार यांनी रविवारी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीतील जीतन राम मांझी यांच्या उपस्थितीमुळे ही चर्चा सुरु झाली आहे. कोणालाही कल्पना नसताना जीतन राम मांझी अचानक या पार्टीत आले होते. यावेळी नितीश कुमार यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. त्यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


मात्र, जितन राम मांझी यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. 'जदयू'कडून आम्हाला इफ्तार पार्टीचे निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी आमच्या कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आता सोमवारी माझ्या निवासस्थानी हिंदुस्तानी आवाम मोर्चाची इफ्तार पार्टी आहे. या पार्टीला आम्ही नितीश कुमार यांना निमंत्रण दिल्याचे मांझी यांनी सांगितले. 


बिहारमध्ये नितीश कुमारांचा मंत्रिमंडळ विस्तार; भाजप नेत्यांना वगळले


दरम्यान, उपेंद्र कुशवाह हे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी म्हटले की, भाजपने विश्वासघातासाठी तयार राहावे. नितीश कुमार हे जनादेशाचा अवमान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. लोकांचा आणि युतीमधील सहकाऱ्यांचा विश्वासघात करणे ही त्यांची जुनी सवय आहे. त्यामुळे भाजपने सतर्क राहिले पाहिजे, असे कुशवाह यांनी सांगितले.