चंदीगड : पंजाब काँग्रेसच्या (Punjab Congress) अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. भाजपने आता पंजाब निवडणुकीसाठी (Punjab Election) कंबर कसली आहे. राज्यात येत्या वर्षात निवडणुका होत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून आऊट गोईंग सुरु झालंय. मुख्यमंत्री पदावरुन हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्षाची स्थापना केलीये. त्यांनी भाजपसोबत युती केली आहे. त्यातच आता काँग्रेसच्या 2 आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पंजाब प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत मंगळवारी काँग्रेसच्या 2 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फतेह सिंह बाजवा आणि बलविंदर सिंह लाड्डी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. याशिवाय पंजाबमध्ये ईसाई समुदायाचे मोठे नेते कमल बक्शी, पंजाब-हरियाणा हायकोर्टातून सेवानिवृत्त वकील मधुमीत, उद्योगपती जगदीप सिंह धालीवाल आणि माजी क्रिकेटर दिनेश मोंगिया यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.


फतेह सिंह यांचे मोठे भाऊ प्रताप सिंह बाजवा यांच्या कादियां विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायची होती. यासाठी सिद्धू यांनी त्यांचं समर्थन देखील केलं होतं. पण आता या जागेवर 2 भावांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे.


हरगोबिंदपूर येथून काँग्रेसचे आमदार बलविंदर सिंह लड्डी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी ही त्यांना पाठिंबा दिला होता. पण दोन्ही आमदारांनी तरीही भाजपमध्ये जाणं पसंत केलं आहे.


केंद्र सरकारने तीन कृषी कायदा आणल्यानंतर भाजपचा जुना मित्रपक्ष शिरोमणि अकाली दलाने भाजपसोबत युती तोडली होती. त्यामुळे भाजपला नव्या मित्र पक्षाची गरज होती. अमरिंदर सिंह यांच्यामुळे भाजप अजून मजबूत झालीये. दुसरीकडे आम आदमी पक्ष देखील पंजाबमध्ये जोर लावत आहे. त्यामुळे काँग्रेस पुढचं आव्हान वाढणार आहे.