अमित जोशी, मुंबई : निवडणुकीमध्ये प्रचारासाठी वेगवेगळी अस्त्रं वापरली जातात. यंदाच्या निवडणुकीसाठी भाजपनं थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कॉल सेंटरवर भर देण्याचं ठरवलं आहे. नमस्कार मै नरेंद्र मोदी बोल रहा हू. असा थेट पंतप्रधानांचा फोन तुम्हाला पुढच्या काळात येऊ शकतो. कारण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रचारासाठी कॉल सेंटरचा वापर करणार आहे. प्रत्येक 4 लोकसभा मतदारसंघामागे एक कॉल सेंटर असणार आहे. लोकसभा मतदारसंघाची व्याप्ती आणि लोकसंख्येनुसार कॉल सेंटरची संख्या बदलली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या या कॉल सेंटरमध्ये प्रशिक्षित तरुणाईची फौज असणार आहे. प्रत्यक्ष प्रचार सुरू होण्याआधी, प्रचार सुरू असतांना, मतदानाच्या काही दिवस आधी नागरिकांना फोन आणि SMS केले जातील. उमेदवाराबद्दल मत विचारलं जाईल. त्याचबरोबर मोदी /भाजपाला मत देण्याची विनंती केली जाणार आहे. मतदारांना फोन करुन विकास कामांची माहितीही दिली जाणार आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत देशांत 17 कोटी मते मिळाली होती तर राज्यात विधानसभा निवडणुकीत सुमारे एक कोटी 47 लाख मते मिळाली होती. 


या कॉल सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. सध्या काँग्रेस आघाडीने जागावाटप करत लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पण शिवसेना - भाजपचे जागावाटप अजून अधांतरी आहे. पण याआधी बहुतांश ठिकाणी कॉल सेंटर्सची स्थापना झाली आहे. त्या माध्यमातून प्राथमिक प्रचाराला सुरुवातही झाली आहे. नागरिकांना फोन यायला सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या अनेक आयुधांपैकी एक आयुध असलेल्या कॉल सेंटर्समार्फत केलेला प्रचार किती प्रभावी ठरतो याचं उत्तर निकालाच्या दिवशी मिळेल.