राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी- अमित शाह
सर्व चोर चौकीदाराला घाबरले. कॉंग्रेसने देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचेही ते म्हणाले.
नवी दिल्ली : भारत आणि फ्रांस यांच्यामध्ये झालेल्या राफेल डीलच्या चौकशी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. याचिकांवर सुनावणी करताना सीजेआय रंजन गोगोई यांच्या पीठाने या सुनावणीत कोणताही गोंधळ न झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यासही नकार देण्यात आलाय. या प्रकरणी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. सर्व चोर चौकीदाराला घाबरले. कॉंग्रेसने देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याचेही ते म्हणाले.
जनतेला उत्तर द्यावं
'आज सर्वोच्च न्यायालयात खऱ्याचा विजय झालाय. खोट्याचा आधार घेऊन देशाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न झालाय' असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधलाय. 'विमानांच्या गुणवत्तेवरही सर्वोच्च न्यायलयाने कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. राफेल सौद्याला विलंब झाल्याचं उत्तर कॉंग्रेसने जनतेला द्यायला हवं. प्रत्येक वेळी कॉंग्रेसने अडथळे आणले. युपीए सरकार असताना तर घोटाळ्यांची रांगच लागली होती', असेही ते म्हणाले.
राहुल गांधींनी माफी मागावी
राफेल खरेदी प्रकरणात देशाची दिशाभूल करणाऱ्या राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी अशी मागणी अमित शाह यांनी केली. राफेल सौद्याप्रकरणी सरकार सभागृहात चर्चेला देखील तयार आहे. यावेळी सभागृह बरखास्त होणार नाही याची काळजी मी घेतो. चर्चे दरम्यान कॉंग्रेसने सर्व पुरावे सभागृहात आणावेत. पण कॉंग्रेस चर्चेपासून पळतेय असा आरोपही शाह यांनी यावेळी केला.
कॉंग्रेसचे काल्पनिक विश्व
कॉंग्रेस पार्टी एक काल्पनिक विश्व बनवून बसली आहे. यामध्ये सत्य आणि न्यायाला कोणतीच जागा नाही. प्रश्न देखील कॉंग्रेस पक्ष तयार करते आणि वकील आणि न्यायाधीश देखील तेच आहेत.
आज कॉंग्रेस पक्ष देशाच्या सर्वोच्च न्यायायलयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचेही ते म्हणाले.