बंगळुरु : कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत मतभेत चव्हाट्यावर आले आहेत. बंगळुरूच्या इगल्टन रिसॉर्टमध्ये दोन आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. विजयानगरचे आमदार आनंद सिंग आणि कॅम्पीचे आमदार जे.एन. गणेश एकमेकांना भिडले. यात आनंद सिंग जखमी झाले असून त्यांना बंगळुरूमधल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी जे.एन. गणेश यांच्या पत्नीनं आनंद सिंग यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. सकाळी ११ वाजता सिद्धरामय्या यांनी ही बैठक बोलावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकात राजकीय वातावरण सध्या गरम आहे. काँग्रेसच्या या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी न होणाऱ्या ४ आमदारांना देखील पक्षाने नोटीस पाठवली आहे. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही आमदारांमध्ये हाणामारी ही शनिवारी रात्री घडली. या रिसॉर्टमध्ये काँग्रेस आमदार शुक्रवारीपासून थांबले आहेत.


मुख्य विरोधी पक्ष भाजपकडून आमदार फोडले जावू नयेत म्हणून काँग्रेसने आपल्या आमदारांना या रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. रविवारी उपस्थित नसलेल्या ४ आमदारांना नोटीस पाठवून त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये म्हणून उत्तर मागितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आनंद सिंह यांचे डोळे हाणामारीनंतर काळे पडले आहेत.


गणेश हे काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्य़ाचा दावा केला जात आहे. बीएस येदियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला आणि विधानसभा अध्यक्ष के आर रमेश कुमार यांना या घटनेबाबत रिपोर्ट मागावा अशी मागणी केली आहे.