नवी दिल्ली : प्रियंका गांधी वाड्रा यांच्या सक्रीय राजकारणातल्या प्रवेशानंतर भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे. बहिणीला राजकारणात उतरवून काँग्रेसने राहुल गांधी अपयशी झाल्याचं मान्य केल्याचा टोला भाजपने लगावला आहे. यामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणात सपा-बसपा आणि काँग्रेस यांच्यात दुरावा वाढेल अशी टीका जनता दल संयुक्तने केली आहे. तर प्रियंकांबाबत हा काँग्रेसचा अंतर्गत निर्णय आहे. त्यांचं काम पाहून प्रतिक्रिया देऊ असं उत्तर शिवसेनेनं दिलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका गांधी-वाड्रांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांची उत्तर प्रदेशातील नियुक्ती काँग्रेसचा नवा विचार रुजवणार असल्याचा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाला शक्य तेवढं सहकार्य करणार असल्याचंही राहुल गांधी यांनी नमूद केलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपलं ट्रम्प कार्ड काढलं आहे. राजकारणात येणार येणार म्हणून सर्व जण ज्याची प्रतीक्षा करत होते त्या प्रियंका गांधींची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आली आहे. 




विशेष म्हणजे दिल्लीच्या सत्तेचा मार्ग ज्या उत्तर प्रदेशमधून जातो त्या उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपवडण्यात आली आहे. काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्याकडे उत्तर प्रदेश या संपूर्ण राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियांका गांधी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.