LokSabha Election: उत्तर प्रदेशच्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून भाजपाने सध्याचे खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांचा पत्ता कट करत त्यांचा मुलगा करण भूषण सिंहला (Karan Bhushan Singh) मैदानात उतरवलं आहे. बृजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर मोठा वाद झाला होता. यामुळे भाजपालाही विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. पण भाजपाने बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांना तिकीट नाकारलं असलं, तरी उमेदवारी त्यांच्याच कुटुंबात देण्यात आली आहे. करण भूषण सिंह हे बृजभूषण सिंह यांचे धाकटे चिरंजीव आहेत. तो डबल ट्रॅप शुटिंगचा खेळाडू राहिला आहे. मागील अनेक दिवसांपासून या मतदारसंघात नेमकं कोणाला उमेदवारी देणार यासंबंधी चर्चांना उधाण आलं होतं. अखेर या घोषणेने चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण भूषण सिंग यांच्या नावाची घोषणा करण्यासोबतच भाजपने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीमधून प्रताप सिंग यांना उमेदवारी दिली. सोनिया गांधी यांच्याकडे असलेल्या या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. 


सहा वेळा खासदार राहिलेल्या बृजभूषण सिंह यांच्यावर देशातील मोठ्या कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर त्य़ांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं होतं. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे भाजपावरही दुसऱा पर्याय शोधण्याची वेळ आली होती. याचं कारण आपलं वर्चस्व असणारा हा मतदारसंघ गमावण्याची भाजपाची इच्छा नव्हती. दुसरीकडे या मतदारसंघात बृजभूषण सिंह यांचा मोठा दबदबा आहे. त्यामुळे त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करणंही भाजपाला परवडणारं नाही. ही सर्व राजकीय गणितं लक्षात घेता त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसरा, भाजपा नेतृत्वाने बृजभूषण सिंह यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी ते तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते. त्यांचे मोठे चिरंजीवर प्रतीक भूषण सिंग हे आमदार आहेत. करण भूषण सिंग सध्या उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे प्रमुख आहेत.  एक दशकाहून अधिक काळ भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असणारे ब्रृजभूषण शरण सिंग हे गेल्या वर्षीच्या सुरुवातीला चर्चेत आले जेव्हा बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिकसह देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी त्यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आणि मोठ्या प्रमाणात निषेध केला. बृजभूषण सिंह यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले होते. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी कैसरगंजमध्ये मतदान होत आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.