जयपूर: निवडणुकीचे मैदान असो वा सभागृहातील लढाई असो, आपल्या चोख व्यवस्थापनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपवर मंगळवारी जयपूर महापालिकेत नामुष्की ओढावली. पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला. विशेष म्हणजे पालिकेत भाजपकडे घसघशीत बहुमत असतानाही हा प्रकार घडला. त्यामुळे हा पराभव भाजपसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीत भाजपचे बंडखोर नगरसेवक विष्णू लाटा यांना ४५ मते पडली. तर महापौरपदासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार असलेल्या मनोज भारद्वाज यांना ४४ मते मिळाली. त्यामुळे अवघ्या एका मताच्या फरकाने विष्णू लाटा महापौरपदी विराजमान झाले. 


विशेष गोष्ट म्हणजे ९१ जागा असलेल्या जयपूर महानगरपालिकेत भाजपचे ६३ नगरसेवक आहेत. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी ही मते फिरल्याने भाजपचा घात झाला. माजी महापौर अशोक लोहाटी हे सांगानेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजपच्या सर्व नगरसेवकांना एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, विष्णू लाटा यांनी तेथून पळ काढला आणि थेट महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. लाटा यांच्या या विजयामुळे पक्षाला मान खाली घालण्याची वेळ आली आणि पक्षातली गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.