BJP Candidate List For Karnataka Election 2023 : काँग्रेसपाठोपाठ आता भारतीय जनता पक्षानेही कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपली पहिली 189 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादीत 51 लिंगायत उमेदवार असून अनेक विद्यमान मंत्र्यांची तिकीटं कापण्यात आली आहेत. या यादीत 52 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष के ईश्वरप्पा आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांची नावं वगळण्यात आली आहेत. माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पांचा मुलगा विजेंद्र याला त्यांच्या परंपरागत शिकारीपुरामधून तिकीट देण्यात आले आहे. 189 जणांमध्ये एकही मुस्लिम उमेदवार नाही. दरम्यान यादीत स्थान नसल्यामुळे आमदार अनिल बेनाकी यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या जागी रवी पाटील यांना तिकीट मिळाले. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे.


कर्नाटकचे मुख्यमंत्री शिगाव मतदारसंघातून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे त्यांच्या पारंपरिक शिगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी,  मंत्री आर अशोक हे कनकापुरा मतदारसंघात काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या विरोधात उभे राहणार आहेत आणि मंत्री व्ही सोमन्ना वरुणा विधानसभा जागेवर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.


भाजपने 52 नवे चेहरे दिले आहेत. 189 उमेदवारांच्या यादीत 32 ओबीसी उमेदवारांना तिकीट मिळाले आहे, तर 30 एससी आणि 16 एसटी प्रवर्गातील आहेत. या यादीत एकूण 8 महिलांना स्थान मिळाले आहे. याशिवाय 5 वकील, 9 डॉक्टर, 3 शैक्षणिक क्षेत्रातील, 1 सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि 1 भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी यांची नावे यादीत आहेत.


गदीश शेट्टार यांचा पक्षाला इशारा


कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवार चाचपणीसाठी भाजपकडून अनेक बैठका घेण्यात आल्या. त्यानंतरच्या चर्चेनंतर मंगळवारी रात्री भाजपने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, यादी जाहीर होताच पक्षात बंडखोरीचे सूर उमटू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते जगदीश शेट्टार यांचे नाव यादीत नसल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पक्षाच्या या निर्णयाच्या विरोधात जाऊन त्यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


दरम्यान, भाजपकडून त्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना दिल्लीत बोलावले आहे. हुबळी धारवाड (मध्य) जागेवर जगदीश शेट्टार यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. एवढेच नाही तर उत्तर कर्नाटकातील मतदारांवर शेट्टर यांची चांगली पकड आहे. भाजपने पहिल्या यादीत शेट्टर यांच्या हुबळी धारवाड जागेसाठी कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, आपण शेट्टर यांच्याशी बोललो आहोत आणि त्यांचे मन वळवण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.



भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत आपले नाव नाही. इतरांना संधी देण्यात आली आहे. मी 30 वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहे. मी पक्षाच्यावतीने मुख्यमंत्रीही राहिलो आहे. मी 6 वेळा आमदारही झालो आहे. यावेळी मी निवडणुकीत भाग न घेण्यामागचे कारण काय? मी जिंकू शकत नाही असे सर्वेक्षणात आले आहे का? मला आधी सांगितले असते तर बरे झाले असते. आता या निर्णयाने माझे मन दुखावले गेले आहे. मी निवडणूक नक्कीच लढवणार आहे, असे नाराज असलेले जगदीश शेट्टार यांनी सांगितले.