Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेतील बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या नृत्याच्या संबंधित वक्तव्य केले. राहुलच्या या वक्तव्यावर चाहते संतापले आहेत. ऐश्वर्या राय बच्चनविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधींवर आता भाजपकडून जोरदार टीका होत आहे. भाजपने याला कर्नाटकातील जनतेचा अपमान म्हटलं आहे. याआधी देखील राहुल गांधी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन राहुल गांधींनी ऐश्वर्याचा उल्लेख केला होता. मात्र, ऐश्वर्या अयोध्येत झालेल्या कार्यक्रमाला हजर नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा ऐश्वर्याचा उल्लेख केल्याने राहुल गांधींवर टीका केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाराणसीमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी ऐश्वर्या रायचा उल्लेख केला होता. माध्यमांची नावे घेत राहुल गांधी यांनी टीका केली होती. "हे सर्व कोणाचे आहेत? ही मीडिया हाऊस अदानी आणि अंबानी यांची आहेत. शेतकरी, शेतमजूर, गरीब यांच्याबद्दल ते कधीच काही दाखवणार नाहीत. ते करू शकत नाहीत. त्यांचे मालक नाही म्हणतात. भारतातील गरीबांबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये दाखवत नाही. माध्यमात काही दाखवायचे असेल तर ऐश्वर्या राय नाचताना दाखवावी लागते, नरेंद्र मोदी जी 24 तास दाखवावे लागतात. तिथे अमिताभ बच्चन दाखवावे लागतात," अशी टीका राहुल गांधींनी केली होती.


राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. बिग बींनी राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर देत त्यांना गप्प केल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. सर्व काही बाजूला ठेवून संध्याकाळी अमिताभ बच्चन शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करत होते. 'T 4929 – व्यायामाची वेळ.. शरीराची हालचाल.. मनाची लवचिकता.. बाकीचे प्रतीक्षा करू शकतात..,' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.


भाजपची टीका


'भारतीय जनतेने वारंवार नकार दिल्याने नाराज झालेले राहुल गांधी भारताची शान असलेल्या ऐश्वर्या रायला हिणवण्याच्या पातळीवर आले आहेत. कोणतेही कर्तृत्व नसलेल्या चौथ्या पिढीतील वंशज आता संपूर्ण गांधी घराण्यापेक्षा भारताला अधिक वैभव मिळवून देणाऱ्या ऐश्वर्या रायविरुद्ध बोलू लागले आहेत," असे कर्नाटक भाजपने म्हटले आहे.