BJP Game Plan for Lok Sabha Election 2024: 2024 लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास अजून 400 दिवस शिल्लक आहेत. मात्र भाजपाने (BJP) आतापासूनच निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपाने देशात होणाऱ्या नऊ राज्यांमधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली रणनीती आखली आहे. बैठकीत नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी निवडणुकीसाठी 400 दिवस शिल्लक असून अशा स्थितीत सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक दरवाजापर्यंत पोहोचावं लागेल असं म्हटलं होतं. आगामी निवडणुकीत पक्षाने गुजरातमधील भाजपा नेते सीआर पाटील (BJP Leader C R Patil) यांच्या फॉर्म्यूला अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा नऊ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमधील फॉर्म्यूला (Gujarat Election Formula) लागू करणार आहे. विजयाच्या या फॉर्म्यूलाची सुरुवात गुजरातच्या नवसारी येथून झाली होती. याच्याच आधारे सीआर पाटील यांनी गुजरातमधील अनेक निवडणुकांमध्ये विजय मिळवल्याचं बोललं जात आहे. हा फॉर्म्यूला पेज कमिटीचा होता. हा फॉर्म्यूला लागू केल्यानंतर भाजपाला पंचायत, महापालिका, नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला. 


जे नरेंद्र मोदींना जमलं नाही, ते सीआर पाटील यांनी करुन दाखवलं


सीआर पाटील याच फॉर्म्यूलाच्या आधारे निवडणुकीच्या आधी मोठ्या विजयाचे दावे करत होते. गुजरातच्या निकालातही हे स्पष्ट दिसत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान असतानाही गुजरात विधानसभा निवडणुकीत इतका मोठा विजय मिळवता आला नव्हता. मात्र सीआर पाटील यांनी काँग्रेसचा दारुण पराभव केला. काँग्रेस फक्त  १७ जागांवर विजय मिळवू शकला. तर भाजपाने 182 पैकी 159 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. 


पेज कमिटीमुळे भाजपाला हा विजय मिळाला. गुजरातमध्ये भाजपाने 15 लाख पेज कमिटी तयार केल्या असून, 75 लाख सदस्यांवर प्रत्येक बूथवरील 50 टक्के मतं मिळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या सदस्यांनी निवडणुकीच्या आधी काम केलं आणि नंतर मोठा विजय मिळवला.


9 राज्यांमध्ये लागू होणार फॉर्म्यूला


भाजपा नऊ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत या फॉर्म्यूलाची अंमलबजावणी करणार आहे. विधानसभा निवडणूक असणाऱ्या प्रत्येक राज्यात पेज कमिटी गठीत केली जाणार असून प्रत्येत बूथवर पोहोचून पक्षाला मजबूत केलं जाईल. 


बुधवारी निवडणूक आयोगाने तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली होती. यामध्ये नागालँड, मेघालय आणि त्रिपुराचा समावेश आहे. त्रिपुरात 16 फेब्रुवारीला मतदान होणार असून, नागालँड आणि मेघालयात 27 फेब्रुवारीला मतदान केलं जाईल. 2 मार्चला तिन्ही राज्यांचे निकाल जाहीर होणार आहेत.