गुवाहाटी - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत हार पत्करावी लागल्यानंतर भारतीय जनता पक्ष सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाला या पराजयामुळे धक्का लागला आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तिन्ही भाजपशासित राज्यात पक्षाला पराभवाचा झटका बसला आहे. या सगळ्या स्थितीमध्ये पक्षासाठी आनंदाची बातमी आहे. आसाममधील पंचायत निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार पंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल काँग्रेसचा क्रमांक आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार भाजपला या निवडणुकांमध्ये ४५ टक्के मते मिळाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसामचे निवडणूक आयुक्त एच एन बोरा म्हणाले, २६८०८ जागांसाठी बुधवारी सुरु झालेली मतमोजणी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत व्होटिंग मशिनऐवजी मतपत्रिकांचा वापर केला गेला होता. आतापर्यंत आमच्याकडे १२१८ पदांचे निकाल आले आहेत. ज्यामध्ये १०८९ ग्राम पंचायत सदस्य, ७१ ग्राम पंचायत अध्यक्ष आणि ५८ पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे. 


बोरा म्हणाले की, ग्राम पंचायत सदस्य निवडणुकीत भाजप ४८१ जागा जिंकला आहे. त्यानंतर काँग्रेसने २९४ आणि आसाम गण परिषदने ११५ जागांवर यश मिळवले आहे. 
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य आणि ग्राम पंचायत अध्यक्ष यांच्या विविध पदांसाठी रविवारी राज्यात मतदान झाले होते.