नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येताच कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. यानंतर भाजप शासित आसाममध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. पण ही कर्जमाफी 25 टक्के आहे. जास्तीत जास्त 25 हजारापर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. आसाम सरकार कर्जमाफीवर 600 कोटी रुपये खर्च करणार आहे. याचा फायदा राज्यातील 8 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. आसाम सरकारचे प्रवक्ते आणि मंत्री चंद्र मोहन पटवारी यांनी म्हटलं की, 'सरकारने 25 टक्के कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त 25 हजारापर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे. यामध्ये सगळ्या प्रकारच्या कृषी कर्जाचा समावेश आहे. क्रेडिट कार्ड आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेले कर्ज माफ केले जाणार आहेत.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने व्याज दिलासा योजनेला देखील मंजुरी दिली आहे. यानुसार जवळपास 19 लाख शेतकऱ्यांना पुढच्या आर्थिक वर्षात शून्य व्याजावर कर्ज दिलं जाणार आहे. सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठक हा निर्णय घेण्यात आला. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 600 कोटींचा ताण वाढणार आहे.


मंत्रिमंडळात शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डने कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी 10,000 पर्यंत सबसिडी देखील दिली जाणार आहे. मंत्रिमंडळात राज्यातील स्वतंत्रता सेनानी यांचं पेंशन 20,000 रुपयांवरुन 21,000 रुपये करण्यात आलं आहे. राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योग सुविधा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.