एक कोटी रूपयांची फसवणुक; भाजप नेत्याल अटक
या भाजप नेत्यावर आरोप आहे की, त्यांनी सॉल्ट लेक येथे राहणाऱ्या दिप्ती सेन यांच्या मृत बहिणीचे घर विकून फसवणूक केली आहे.
कोलकाता : तब्बल एक कोटी रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी भाजप नेता अनुपम दत्त यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोलकाताच्या डम डम विमानतळावर पोलिसांनी ही कारवाई केली. दत्त यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील प्रदीर्घ काळ तृणमूल कॉंग्रेससोबत व्यतीत केला पण, ते सध्या भाजपसोबत कार्यरत आहेत. दत्त यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी सॉल्ट लेक येथे राहणाऱ्या दिप्ती सेन यांच्या मृत बहिणीचे घर विकून फसवणूक केली आहे. पोलिसांनी अनुपम दत्त यांच्यावर कट रचने आणि फसवणूक कल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दिप्ती सेन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दिप्ती सेन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सेन यांनी आपली जमीन मधुसुधन चक्रवर्ती नावाच्या व्यक्तीला विकली होती. सेन यांची चर्कवर्ती नावाच्या व्यक्तीशी अनुपम दत्त यांनी भेट घालून दिली होती. दरम्यान, डम डमचे डीसी संतोष पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुसुधन चर्कवर्ती याला या प्रकरणी जामीन मिळाला असून, सध्या ते तूरूंगाबाहेर आहेत.
दिप्ती सेन यांनी ३ जुलै रोजी दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, दिप्ती आपली मोठी बहीण बानी डे हिच्या मृत्यू नंतर तिचे घर विकू इच्छित होती. ती घर विकण्याच्या प्रयत्नात असतानाच्या काळात त्यांची अनुपम दत्त यांच्याशी भेट झाली. दत्त यांनी सेन यांची भेट मधुसुदन चक्रवर्ती याच्याशी घालून दिली. चक्रवर्तीने सांगितले की, आपल्या बहीणीने मृत्यूपूर्वी जमीन तुमच्या नावे प्रोबेट केली नाही. त्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून मृत व्यक्तीच्या नावे शेवटचे मृत्यूपत्र करावे लागते. मधुसुधनने सांगीतले की, कायदेशिररित्या हे योग्य नाही. पण, काळजी करू नका. जमीन विक्रीसाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे मी स्वत: उपलब्ध करून देईन.
दरम्यान, हा सौदा दिप्ती आणि मधुसुधन यांच्यात १.१ कोटी रूपयांमध्ये झाला. मात्र, मधुसुधनने दिप्ती यांना केवळ ६९ लाख रूपयेच दिले. सोबतच त्याने दिप्तीवर आरोप ठेवला की, तिने चुकीच्या पद्धतीने आपलया बहिणीचे घर विकले आहे. ठरल्या व्यवहारातील सर्व पैसे मिळाले नसल्यामुळे दिप्तीने मधुसुधन आणि अनुपम दत्त यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
दरम्यान, अनुपम दत्त यांना सध्या पोलीस रिमांड मध्ये ठेवण्या आले आहे. कोर्टासमोर हजर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतना दत्त यांन सांगितले की, माझ्याविरोधात रचलेला हा राजकीय कट आहे.