बिहार विधानसभेत (Bihar Assembly) गोंधळ घातल्यानंतर आंदोलनसाठी बाहेर पडलेल्या भाजपा (BJP) नेत्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या गोंधळात एका भाजपा नेत्याचा मृत्यू झाला आहे. पाटण्याच्या डाकबंगला येथे पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जहानाबाद नगर येथील भाजपाचे महामंत्री विजय कुमार सिंह (Vijay Kumar Singh) यांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये (Bihar) शिक्षकांच्या नियुक्तीवरुन भाजपाकडून आंदोलन केलं जात आहे. भाजपा (BJP) नेत्यांनी आधी सभागृहात गोंधळ घातला आणि नंतर सभात्याग करत बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी मोर्चा काढला. आंदोलन सुरु असताना पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. यादरम्यान विजय कुमार सिंह जखमी झाले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 



विजय कुमार सिंह यांच्या मृत्यूनंतर राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. दरम्यान, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी याप्रकरणी नितीश सरकारला घेरलं आहे. जे पी नड्डी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की "पाटण्यात भाजपा कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जमधून सरकारचं अपयश आणि आक्रोश दिसत आहे. हा त्याचा परिणाम आहे. महागठबंधनचं सरकार आपल्या भ्रष्टाचाराच्या किल्ल्याला वाचवण्यासाठी लोकशाहीवर हल्ला करत आहे. ज्या व्यक्तीविरोधात चार्जशीट दाखल झाली आहे, त्याला वाचवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री आपली नैतिकताही विसरले आहेत". 



भाजपा नेते सुशील मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर विजय कुमार खाली जमिनीवर कोसळले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण वाचवता आलं नाही. 



शिक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन सरकारविरोधात मोर्चा


याआधी गुरुवारी सभागृहात जोरदार गदारोळ झाला होता. शिक्षकांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले होते. भाजपा सदस्यांनी वेलमध्ये उतरुन सरकारला घेरलं आणि आंदोलन केलं. यानंतर मार्शल्सनी भाजपाच्या दोन आमदारांना बाहेर काढलं. यानंतर मोर्चा काढणाऱ्या आमदार आणि नेत्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. 



भाजपाने गुरुवारी नितीश सरकारविरोधात विधानसभा मार्च पुकारला होता. विधानसभेचं कामकाज सुरु होताच भाजपा सदस्यांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.