रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. ६ जनपथ येथे त्यांची पवारांसोबत बैठक सुरु आहे. या बैठकीत काय चर्चा होणार याकडे राज्यातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकिट डावलल्यानंतर खडसे हे नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीररीत्या बोलूनही दाखवली आहे. दरम्यान ते पक्ष सोडणार असल्याचीही चर्चा रंगू लागली. पण त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांच्याशी माझे जुने संबंध आहेत. त्यांना भेटायचे असले तर मी जाऊ शकतो असे विधान त्यांनी 'झी २४ तास'कडे केले.



महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत भाजपच्याच नेत्यांनी विरोधात काम केल्यामुळे नाराज झालेले एकनाथ खडसे पुरावे घेऊन दिल्लीत आले आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाची भेट घेणार आहेत. पक्षात कितीही मोठा नेता असला तरी त्यांच्यावर कारवाई करावी अशी उद्वीग्न प्रतिक्रिया त्यांनी 'झी २४ तास'कडे व्यक्त केली.



रोहिणी खडसे यांना तिकीट देण्याची माझी इच्छा नव्हती. तसेच इच्छा असूनही मला तिकीट देण्यात आले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. रोहीणी खडसेंचा पराभव करण्यात पक्षातील लोकांचा हात असल्याचेही ते म्हणाले. निवडणूकीत भाजपच्याच उमेदवारांना पाडण्याचे काम करण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे पुरावे देणार असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे खडसे म्हणाले.