नवी दिल्ली: फक्त पोहे खाणारे लोक बांगलादेशी असतात, असा अजब सिद्धांत भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी मांडला आहे. ते शुक्रवारी इंदूर येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA)समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी माझ्या घराचे काम सुरु होते. हे काम करण्यासाठी आलेल्या मजुरांपैकी काहीजण बांगलादेशी असल्याचा संशय मला होता. त्यांच्या खाण्याच्या सवयीवरून मी हा अंदाज लावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते मजूर पोळी खात नव्हते, केवळ भरपूर पोहे खायचे. ते हिंदी बोलत नाहीत त्यांना हिंदी समजत नाही. ते कुठल्या जिल्ह्य़ातील आहेत हे सांगू शकत नाहीत ते कुठल्या जिल्ह्य़ातील आहेत हे त्यांनी सांगितले असते तर मी समजू शकलो असतो कारण मला पश्चिम बंगालची बारीक माहिती आहे, पण त्या कामगारांना अशी माहिती नव्हती. त्यामुळे ते मजूर बांगलादेशी असावेत, असा निष्कर्ष मी काढला. विशेष म्हणजे दोन दिवसांनंतर ते पुन्हा माझ्या घरी आलेच नाहीत. मी याची पोलिसांत तक्रार केली नाही. पण लोकांनी सावध राहावे म्हणून मी ही गोष्ट सांगत असल्याचे विजयवर्गीय यांनी म्हटले होते. 


साहजिकच कैलास विजयवर्गीय यांच्या विधानावरून मोठा वादंग निर्माण झाला. सोशल मीडियावरही अनेकांनी त्यांना ट्रोल केले. विजयवर्गीय यांच्या वक्तव्यातून भाजपप्रणीत एनडीए सरकार एनपीआर म्हणजे लोकसंख्या नोंदणी कशा पद्धतीने राबवेल याची झलकच दिसून आली आहे. धर्म, भाषा, समुदाय व खाण्याच्या सवयी यावरून लोकांची ओळख पटवली जाईल असाच याचा अर्थ होतो, अशी टीका विरोधकांनी केली. 



दरम्यान, कैलास विजयवर्गीय विरोधकांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. मी ते उदाहरण शरणार्थी व घुसखोर यांच्यातील भेद दाखवण्यासाठी दिल्याचे त्यांनी स्पष्टीकरण विजयवर्गीय यांनी दिले.