महाराष्ट्रानंतर आता बंगाल? भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या वक्तव्याने TMC मध्ये खळबळ
महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर आता इतर राज्यात देखील भाजप विरोधकांना धक्का देऊ शकते.
कोलकाता : महाराष्ट्राची सत्ता मिळवल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपचे संपूर्ण लक्ष पश्चिम बंगालवर आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात भगवा पक्ष मजबूत करण्याची रणनीती आखत टीएमसीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, अभिनेता आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. विरोधी पक्षाशी त्यांचे "खूप चांगले संबंध" असल्याचे ते म्हणाले.
कोलकात्यात मिथुन यांची पत्रकार परिषद
कोलकाता येथे पत्रकार परिषदेत त्यांनी असेही सांगितले की, 38 पैकी 21 आमदार भाजपच्या थेट संपर्कात आहेत. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मिथुन म्हणाले की तुम्हाला ब्रेकिंग न्यूज ऐकायची आहे का? सध्या 38 टीएमसी आमदारांचे आमच्याशी चांगले संबंध आहेत, त्यापैकी 21 आमच्या थेट संपर्कात आहेत.
महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर आता इतर राज्यात ही विरोधी पक्ष सतर्क झाला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं. शिवसेनेचे 40 आमदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. शिंदे गटाने आता आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केल्यानंतर शिवसेना आता नेमकी कोणाची हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला आहे.