नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 7 जुलैला होण्याची शक्यता असून 17 ते 22 नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातील चार जणांचा समावेश होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात वर्णी लागणार असल्याची माहिती असून राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. नारायण राणे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणारेत. राणेंशिवाय राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, खासदार कपिल पाटील तसंच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यताय. खासदार कपिल पाटील यांनाही दिल्लीतून  फोन आला असून ते दिल्लीला रवाना झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दिल्लीत दाखल झाल्यावर नारायण राणे यांनी आपल्याला असा कोणताही फोन आलेला नाही असं म्हटलं आहे. मी एक खासदार आहे, संसद अधिवेशनापूर्वी मी इथे आलो आहे, काही महत्त्वाचं घडल्यास आपल्याला सांगेन, तुमच्यापासून काही लपवणार नाही, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे.


काही मंत्र्यांनी मिळणार डच्चू?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगली  कामगिरी  नसलेल्या मंत्र्यांना  केंद्रीय  मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो. अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकतं. नरेंद्र सिंह तोमर, रवीशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल आणि प्रल्हाद जोशी यांच्याकडील अतिरिक्त मंत्रालयाची जबाबदारी कमी केली जाऊ शकतं. तर याशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनवाल, त्रिवेंद्र सिंह रावत, अनुप्रिया पटेल, सुशील मोदी, रिटा बहुगुणा जोशी, जफर इस्लाम आणि उत्तर प्रदेशचे सत्यदेव पचौरी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.