भोपाळ : काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजपकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत पक्षात होईल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते नरोत्तम मिश्रा दिली आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. तसेच गेल्या काही दिवसांपासून सिंधिया आणि शिवराज चौहान यांच्यात अनेकदा भेटीगाठी झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी नरोत्तम मिश्रा यांची प्रतिक्रिया आल्याने अधिकच चर्चा रंगू लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भाजपमध्ये आम्ही अगदी तळागाळातील लोकांना सहभागी करु घेतले आहे. सिंधिया जी खूप मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत आहे, भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले. त्यांना एक प्रश्न विचारल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्षात सर्वांचे मनापासून स्वागत आहे, असेही ते म्हणालेत. दरम्यान, मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळण्याची शक्यता जास्त दिसत आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडखोर भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. 



दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये तीन गट आहेत, पहिला कमलनाथ, दुसरा दिग्विजय सिंह आणि तिसरा ज्योतिरादित्य सिंधिया. सिंधिया गटाचे १७ आमदार सध्या बंगळुरूमध्ये तळ ठोकून आहेत. ज्योतिरादित्य सिंधियांबद्दल असेही वृत्त आहे की त्यांचे वडील माधवराव सिंधिया (१० मार्च) यांच्या जयंतीनिमित्त ते भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल होऊ शकतात. सिंधिया भाजपमध्ये सामील होतील, त्यांच्या गटातील आमदार मध्य प्रदेश विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतील आणि कमलनाथ सरकार अल्पसंख्याकात येईल, अशी शक्यता आहे. कारण ज्योतिरादित्य सिंधिया यानी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्याचवेळी काँग्रेस नेत्यांना टाळत असल्याचे पुढे आले आहे.


मध्य प्रदेश भारतीय जनता पक्षाचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'यामागील काहीतरी कारण असावे, कोणतेही असे करण्यास मुर्ख नाही.' नरोत्तम मिश्रा पुढे म्हणाले, 'भाजपने अचानक विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली नाही. खूप विचारपूर्वक बोलावली आहे. हे भाजप आहे, सर्वांचे मनापासून स्वागत केले जाईल. माझ्या राजकीय अनुभावरुन सांगतो, कमलनाथ सरकार कोसळले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या राजकारणावर दिल्लीतील पत्रकारांनी शिवराजसिंह चौहान यांना विचारले असता त्यांनी काँग्रेस पक्षाची अंतर्गत बाब म्हटले.