नवी दिल्ली : खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली नसल्याने मुंडे बहिणी नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे दिल्लीत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर सहभागी झाल्या. ही बैठक तासभर चालली. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्यासह इतर पदाधिकारी पंतप्रधान मोदींच्या भेटीला 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी पोहोचले आहेत.


बीड जिल्ह्यात भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्यानं मुंडे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. बीडमध्ये अनेक मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केलीय. पंकजा मुंडे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना, आपण नाराज नसल्याचं स्पष्ट करत पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं जाहीर केलं. पण बीड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकार्‍यांसह समर्थक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद सदस्यांसह पदाधिकारी राजीनामा देत आहेत. कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी बैठका होत आहेत. पंकजा मुंडे नाराज नसल्या तरी आमची नाराजी कायम आहे, अशा भावना व्यक्त करत पदाधिकार्‍यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. आतापर्यंत पंकजा यांच्या 49 समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे.