पाटणा - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबद्दल बोलताना बिहारमधील भाजपच्या मंत्र्यांची जीभ घसरली. केवळ सुंदर चेहऱ्याला पाहून कोणी मत देत नाही, असे मंत्री विनोद नारायण झा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर प्रियंका गांधी या रॉबर्ट वाड्रा यांची पत्नी आहेत. रॉबर्ट वाड्रा यांच्यावर जमीन घोटाळा आणि भ्रष्टाचाराचे विविध आरोप आहेत. याकडेही विनोद नारायण झा यांनी लक्ष वेधले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपद दिले असून, त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी पहिल्या दिवसापासून काँग्रेसच्या निर्णयावर टीका केली. प्रियंका गांधी दिसायला खूप सुंदर आहेत. पण यापेक्षा राजकीयदृष्ट्या त्यांच्याकडे इतर कोणताही अनुभव नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे. 


उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने केलेल्या आघाडीत काँग्रेसला सहभागी करून घेण्यात न आल्याने राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला, अशी टीका बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केली. त्याचबरोबर प्रियंका गांधी या रॉबर्ट वाड्रा यांच्या पत्नी म्हणून राजकारणात येत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भाजपच्या विरोधातील मतांचे विभाजन होत असेल, तर त्याचा भाजपलाच फायदा होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.


दरम्यान, प्रियंका गांधी यांना काँग्रेसमध्ये आणखी मोठे पद मिळायला हवे होते, असे म्हणत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हळूच राहुल गांधी यांना चिमटा काढला. पक्षाच्या सरचिटणीस झाल्याबद्दल रविशंकर प्रसाद यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.