नवी दिल्ली: भाजपच्या हातातून महाराष्ट्राची सत्ता गेल्यामुळे राज्यात सध्या तमाशा सुरु आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्राची संस्कृती बदनाम केली जात आहे. यावरून भाजपच्या नेत्यांची विचारसरणी किती वाईट आहे, हे लक्षात येईल, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. ते रविवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना राणौतच्या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीविषयीही त्यांनी भाष्य केले. राज्यातील निरपराध व्यक्तींवर हल्ला होऊ नये, हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे हल्लेखोरांना ताबडतोब अटक करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य शाबूत आहे, इतरांनी त्याची चिंता करू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री कंगना रानौत राज्यपालांच्या भेटीला


तसेच भाजपकडून कोरोना आणि इतर महत्त्वाचे प्रश्न सोडून लहानसहान गोष्टींवर लक्ष दिले जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे, चीनच्या सीमेवरील तणाव शिगेला पोहोचला आहे. मात्र, आपल्या देशातील प्रमुख मंत्री या विषयांवर बोलायचे सोडून छोट्या छोट्या गोष्टींवर बोलण्यात धन्यता मानत आहेत, असे राऊत यांनी म्हटले. 

यावेळी राऊत यांनी कंगना प्रकरणावर थेट बोलण्यास नकार दिला असला तरी तिला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. एका राज्याच्या पोलिसांना माफिया बोलले जाते. नंतर त्यांच्याच संरक्षणात लोक फिरतात. आम्ही कोणालाही राज्याबाहेर जाण्यास सांगितले नाही. महाराष्ट्रात या, आपले काम करा आणि राज्याला आपले माना, हीच शिवसेनेची भूमिका आहे. लॉकडाऊनच्या काळात आपापल्या गावी गेलेले लाखो लोक आज मुंबईत परतत आहेत. कारण त्यांना मुंबई सुरक्षित असल्याचा विश्वास आहे. मात्र, काही लोकांनी तमाशाच करायचा ठरवला असेल तर  आपण काही करू शकत नाही, असे राऊत यांनी म्हटले.