बिल्डरमुक्त मुंबईसाठी भाजप नेते आग्रही, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी केली मागणी
आत्मनिर्भर पुनर्विकास योजना राबवण्याची भाजप नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे विनंती केली आहे
नवी दिल्ली : बिल्डरमुक्त मुंबईसाठी भाजप नेते आग्रही असल्याची माहिती मिळतेय. आत्मनिर्भर पुनर्विकास योजना राबवण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. या योजनेसाठी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांना विनंतीही करण्यात आली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी ही विनंती केल्याची माहिती मिळत आहे.
जवळपास 60 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अशी योजना राबवावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. बिल्डरतर्फे पुनर्विकसित करण्यात येणाऱ्या चाळी, सोसायटी स्थानिक रहिवाशांच्या हाती विकसित करण्यासाठी देण्यात याव्यात आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत ही योजना राबवावी, जेणेकरुन केंद्र सरकार या योजनेसाठी कर्ज देईल आणि जे रहिवाशी आहेत तेच मालक व्हावेत अशी ही योजना आहे.
या योजनेमुळे बिल्डरांकडून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लावण्यात येणारा विलंब कमी होईल, वाढीव खर्चही कमी होईल, तसंच पुनर्विकास केल्यानंतर काही सदनिका बिल्डरला द्यावा लागत होत्या त्या रहिवाशांनाच वापरता येतील, हे योजनेचे फायदे आहेत.
या योजनेला ग्रीन सिग्नल मिळाल्यास हा देशभरात महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.