मुंबई - लोकसभेची सेमीफायनल म्हणून बघितल्या गेलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठी हार पत्करावी लागली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या तिन्ही राज्यांतील भाजपची सत्ता त्यांच्या हातातून गेली आहे. तर तेलंगणामध्ये भाजपला सर्वांत वाईट निकालाला सामोरे जावे लागले आहे. तेलंगणा विधानसभेतील ११९ जागांपैकी ११८ जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते. केवळ एक जागा सहकारी पक्ष युवा तेलंगणा पार्टीसाठी सोडली होती. यापैकी फक्त एकाच जागेवर भाजपला यश मिळाले आहे. २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पाच जागांवर यश मिळाले होते. ते सुद्धा यावेळी मिळवता आले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राजीनामा दिल्यामुळे मुदतपूर्व निवडणुका झाल्या. या निवडणुकीत राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाने दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत. पक्षाने एकतर्फी विजय मिळवल्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा राज्यात सुपडासाफ झाला. हैदराबादमधील गोशामहल विधानसभा जागेवरून भाजपचे राजा सिंह लोधी हे एकमेव उमेदवार निवडून आले. बाकी ११७ जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. 


तेलंगणामध्ये भाजपच्या जागा वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभा झाल्या होत्या. त्यानंतरही प्रभावशाली कामगिरी करण्यात भाजपला अपयश आले. तेलंगणा राष्ट्र समितीला ८८ जागांवर यश मिळाले आहे. के. चंद्रशेखर राव गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसलाही या निवडणुकीत निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या केवळ १९ जागा निवडून आल्या आहेत. तर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीला १९ जागांवर यश मिळाले.