जयपूर : राजस्थानमधल्या दोन लोकसभा आणि एका विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे. राजस्थानमध्ये भाजपनं पद्मावत चित्रपटावर बंदी घातली नाही म्हणून त्यांचा पराभव झाल्याचा आरोप करणी सेनेनं केला आहे. २९ जानेवारीला झालेल्या मतदानावेळीच भाजपचा पराभव होईल, हे स्पष्ट होतं. आज त्याचा फक्त निकाल आला आहे. राजपुतांच्या एकीमुळेच भाजपचा राजस्थानमध्ये पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंग कालवी यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटावर अजूनही बंदी घालावी अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे, असं कालवी म्हणाले. अजमेरची लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर राजपूत राहतात. त्यामुळे पद्मावतवरून सुरु असलेला वाद हे भाजपच्या पराभवाचं कारणं मानलं जातंय.


राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार दे धक्का दिला. लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा काँग्रेसने जिंकली.


भाजपच्या सत्तेला हादरा


सकाळी मतमोजणी सुरु झाली तेव्हाच काँग्रेसने आघाडी घेतली होती. अजमेर आणि अलवर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. तर मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला मागे टाकले होते. मात्र, तेथेही काँग्रेसने बाजी मारली आहे. राज्यस्थानमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे भाजपचा हा पराभव म्हणजे जोरदार धक्का आहे.


भाजपच्या गोटात चिंता


भाजप खासदार प्रा. सांवर लाल जाट (अजमेर), खासदार चांद नाथ योगी (अलवर) आणि आमदार कीर्ति कुमारी (मांडलगढ) यांच्या निधनानंतर या तीन ठिकाणी पोट निवडणूक झाली.  राज्यस्थानमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता होती. तर दुसरीकडे काँग्रेसने आधीच विजयाचा दावा केला होता. तो त्यांनी निवडणूक जिंकून खरा केलाय.


काँग्रेसचे हे उमेदवार विजयी


अलवर लोकसभा मतदार संघातून भाजपचे जवंसत सिंग यादव विरुद्ध काँग्रेसचे डॉ. करण सिंग यादव (४० हजार मतांनी) तर अजमेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रघु शर्मा विरुद्ध भाजपचे रामस्वरुप लांबा अशी लढत झाली. २०,६४८ मतांनी रघु शर्मा विजयी झालेत. तर मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपचे शक्ति सिंग हाडा विरुद्ध काँग्रेसचे विवेक धाकड यांच्यात लढत झाली.


विधानसभेत भाजपला दणका


अलवर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे डॉ. करण सिंग यादव तर जमेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रधु शर्मा आणि मांडलगढ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विवेक धाकड विजयी (१२,९७४ मतांनी ) झालेत. त्यामुळे एकहाती सत्ता असणाऱ्या राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंदरा राजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांना जोरदार धक्का देण्यात काँग्रेस यशस्वी झालेय.