नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे. सर्व राज्यांमध्ये भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. याच आनंदाच्या भरात भाजपा आमदाराची जीभ घसरली आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार विक्रम सैनी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. जम्मू काश्मीरच्या मुलींशी लग्न करायला खतौली विधानसभेचे कार्यकर्ता उत्सुक असल्याचे विक्रम सैनी म्हणाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर अविवाहीत तरुणांचे लग्न तिथेच लावून देऊ, काही अडचण नाही, असे विधानही पुढे त्यांनी केले. त्याच्या या वादग्रस्त विधानाचा सर्व स्तरातून तीव्र निषेध होत आहे. सोशल मीडियातही याबद्दल संताप व्यक्त होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विक्रम सैनी यांनी याआधी देखील अशी वादग्रस्त विधाने केली आहेत. यामुळे ते नेहमीच वादात असतात. जम्मू काश्मीरच्या महिलांवर किती अत्याचार होत होता असेही ते मंगळवारी म्हणाले. तिथल्या मुलीने जर उत्तर प्रदेशच्या तरुणाशी लग्न केले तक तिचे नागरिकत्व संपले असते. भारताचे आणि काश्मीरचे नागरिकत्व वेगळे असू शकत नाही. आता असे होणार नाही. हे पटवून देताना त्यांनी वादग्रस्त विधान केले. जे मुस्लिम कार्यकर्ता आहेत त्यांनीही आनंदीत व्हायला हवे. हिंदू-मुस्लिम कोणीही असो हा पूर्ण देशासाठी आनंदाचा दिवस असल्याचे ते म्हणाले.