BJP MP Bizarre Take On Unemployment: अभिनय क्षेत्रातून राजकारणामध्ये सक्रीय झालेल्या दिनेश लाल यादव निरहुआ यांनी केलेलं एक विधान सध्या चांगलेच चर्चे आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीसंदर्भात भाष्य करताना दिनेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख केला. या दोन्ही नेत्यांना मुलं-बाळ नसल्याचा संदर्भ देत बेरोजगारी रोखण्यासाठी त्यांनी संतती होऊ दिली नाही, असा विचित्र युक्तीवाद दिनेश यांनी केला आहे. सध्या दिनेश यांच्या या विचित्र युक्तिवादाचा व्हिडीओ काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. 


काँग्रेसच्या महिला नेत्याने शेअर केला व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश लाल यादव निरहुआ हे उत्तर प्रदेशमधील आझमगडचे विद्यमान खासदार आहेत. तसेच ते यंदाही भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार आहेत. एका पत्रकाराशी बोलताना दिनेश यांनी बेरोजगारीसंदर्भात हा अजब युक्तीवाद केला आहे. हा व्हिडीओ काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनीही शेअर केला आहे. "भाजपाचे खासदार निरहुआ यांचं म्हणणं ऐका. "मोदीजींना एक तरी मूल आहे का? योगीजींना एक तरी मूल आहे का? बेरोजगारी वाढू नये म्हणून त्यांनी मुलं होऊ दिली नाहीत. आता यावर आम्ही बोलावं तर काय बोलावं?" अशी कॅप्शन देत अलका लांबा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.


बेरोजगारी वाढू नये म्हणून मोदी, योगींनी मुलं होऊ दिली नाहीत


अलका लांबा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिनेश हे कारमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसून बोलताना दिसत आहेत. बेरोजगारीसंदर्भात बोलताना दिनेश यांनी, "मोदींना एक तरी मूल आहे का? योगींना एक तरी मूल आहे का? नाही ना? नाही आम्ही बेरोजगारी वाढू देणार नाही म्हणत मोदीजी, योगीजींनी बेरोजगारी थांबवली आहे. मग ही बेरोजगारी कोण वाढवत आहे तर जे अनेक मुलांना जन्माला घालत आहेत. सरकार त्यांना थांबायला सांगत आहे तर ते ऐकायलाही तयार नाहीत. जे लोक बेरोजगारी वाढत आहे असं म्हणतात त्यांना सांगा की रोजगार इतका आहे. त्यानंतरही तुम्ही लोकसंख्या वाढवत असाल तर त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्याला थांबवण्याचा प्रयत्न मोदीजी करत आहे. सरकार करत आहे. कमी मुलं जन्माला घालण्याचा नियम सरकार आणू इच्छित आहे. तुम्ही कमी मुलं जन्माला घाला. दोनच मुलं जन्माला घाला असं सांगतात तेव्हा तुम्ही म्हणता मी स्वत: बेरोजगार आहे आणि त्यानंतरही तुम्ही बेरोजगारांना जन्माला घालता. तुम्हाला स्वत:ला तुमचं पोट भरता येत नाही. तुम्ही स्वत: बेरोजगार असल्याचं सांगता तर मग आपण अजून आठ बेरोजगार का निर्माण करायचे असा विचार करता का?" असा युक्तीवाद केल्याचं पाहायला मिळत आहे.



व्हिडीओ खोटा असल्याचा नेत्याचा दावा


हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर दिनेश यांनी सोशल मीडियावरुन आपली प्रतिक्रिया नोंदवताना हा काँग्रेसचा खोडसाळपणा असून एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माझा आवाज वापरुन मला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे. "खोटे व्हिडीओ प्रमोट करणे हा काँग्रेसच्या लोकांसाठी ट्रेण्डच झाला आहे. हा व्हिडीओ पाहणारा कोणीही सांगेल की ओठांची हलचाल आणि वाक्य वेगवेगळी आहेत. तुम्हाला एआय क्लोन केलेला आवाज वापरुन काय सिंद्ध करायचं आहे? निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी," असं दिनेश यांनी म्हटलं आहे.