नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेसाठी भाजप खासदार डॉक्टर वीरेंद्र कुमार हे प्रोटेम स्पीकर असणार आहेत. ते नवीन खासदारांना शपथ देणार आहेत. वीरेंद्र कुमार हे ६ वेळा खासदार आहेत. लोकसभेचं पहिलं अधिवेशन १७ जून ते २६ जुलै दरम्यान होणार आहे. हे बजेट सत्र असणार आहे. १७ जूनला लोकसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर २ दिवस खासदारांना शपथ दिली जाणार आहे. १९ जूनला लोकसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेला संयुक्त बैठकीत 20 जूनला संबोधित करतील. याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी भाजपचे संतोष गंगवार यांचं नाव देखील हंगामी अध्यक्षासाठी चर्चेत होतं. पण त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रोटेम स्पीकर नसतील हे स्पष्ट झालं होतं.


२०१४ मध्ये कमलनाथ प्रोटेम स्पीकर


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार कमलनाथ हे प्रोटेम स्पीकर होते. कमलनाथ लोकसभेतील तेव्हा सर्वात वरिष्ठ खासदार होते. मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून त्यांनी ९ वेळा विजय मिळवला होता.


कोण असतात प्रोटेम स्पीकर ?


प्रोटेम (Pro-tem) शब्द लॅटिन भाषेतील आहे. प्रो टेम्‍पोर (Pro Tempore) असं त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काही काळासाठी. प्रोटेम स्‍पीकरची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ही नियुक्ती लोकसभा अध्यक्ष निवडेपर्यंत असते. प्रोटेम स्पीकर हे निवडून आलेल्या खासदारांना शपथ देतात. शपथविधीचा संपूर्ण कार्यक्रम हा यांच्याच देखरेखेखाली होते. खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षाची निवड होते. राष्ट्रपती लोकसभेतील कोणत्याही एका सदस्याला प्रोटेम स्‍पीकर म्हणून निवडतात.